कर्नाटकमधील नेत्यांकडे सापडले १६२ कोटींचे घबाड


नवी दिल्ली – कर्नाटकचे एक मंत्री आणि प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षांच्या घरी आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये सुमारे १६२ कोटींहून अधिक अघोषित मालमत्ता आढळून आली आहे. ४१ लाख रूपयांच्या रोकडसह सोने, चांदीचे दागिनेही आयकर विभागाच्या या छाप्यात जप्त करण्यात आले आहे.

कर्नाटकचे लघुउद्योग मंत्री रमेश जारकिहळ्ळी आणि प्रदेश महिला काँग्रसेच्या अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या गोकाक आणि बेळगावी येथील मालमत्तेवर मागील आठवड्यात छापे टाकण्यात आले. यामध्ये मोठ्याप्रमाणात बेनामी संपत्ती आणि स्पष्टीकरण देता न आलेल्या गुंतवणुकीबाबत माहिती मिळाली, असल्याचे आयकर अधिकाऱ्यांनी सांगितले.

साखर उद्योग व सहकारी सोसायट्याच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात काळा पैसा जमवल्याचा आरोप दोन्ही नेत्यांवर आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जारकिहळ्ळी हे सौभाग्य लक्ष्मी शुगर लि.चे प्रमुख प्रमोटर आणि संचालक आहेत. त्यांच्या भावाची यामध्ये भागिदारी आहे. आयकर विभागाच्या छाप्यात ११५ कोटींचे काळा पैसा आढळून आला. जारकिहळ्ळी यांच्या नातेवाईक आणि परिचितांच्या खात्यांवर कोट्यवधी रूपये आढळून आले आहेत. त्याचबरोबर कंपनीच्या ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यात २१ लाख रूपयांची रोक आणि १२ किलो सोने जप्त करण्यात आले. जारकिहळ्ळी यांचे दोन भाऊ ही आमदार आहेत.

लक्ष्मी हेब्बाळकर यांचे भाऊ चन्नाराज बी. हट्टीहळ्ळी यांच्या खात्यातही सुमारे ११ कोटी रूपये तर आई गिरिजा हट्टीहळ्ळी यांच्या खात्यात २५.५ कोटी रूपये सापडले. त्याचबरोबर हायटेक इंजिनिअरिंग कॉर्पोरेशनच्या नावाच्या कंपनीच्या खात्यातही १०.५ कोटी जमा करण्यात आले होते. या तिघांना पैशांचा स्त्रोत सांगता आला नाही. हेब्बाळकर यांच्याकडे टाकलेल्या छाप्यात २० लाख रूपयांची रोक सापडली असून ती जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी लवकरच दोघांनाही आयकर विभागाकडून चौकशीसाठी समन्स पाठवले जाणार आहे.

परंतु आपण काही चुकीचे केले नसून माझ्या घरी व कार्यालयावर आयकर विभागाचे छापे मारणे म्हणजे राजकीय कटाचा भाग असल्याचा आरोप जारकिहळ्ळी यांनी केला. आयकर अधिकारी आमच्या बेळगावी येथील घरी आले होते. त्यांना आम्ही योग्य ते सहकार्य केले होते. भविष्यातही आम्ही आयकर अधिकाऱ्यांना सहकार्य करू असे ते म्हणाले. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. १६२.०६ कोटी रूपयांच्या अघोषित संपत्तीबरोबर ४१ लाख रूपयांची रोकड त्याचबरोबर १२.६ किलो सोने आणि चांदीचे दागिने असल्याचे सांगितले.

Leave a Comment