श्रीलंकेची ट्रीप कधी करता येईल हे सांगता येत नसेल तर भारतातूनच श्रीलंकेचे दर्शन नक्की घेता येईल. अर्थात त्यासाठी रामेश्वरम पर्यंतचा प्रवास करावा लागेल. भारतात एक जागा अशी आहे, जेथून श्रीलंकेचे दर्शन होऊ शकते. या ठिकाणाचे नांव आहे धनुषकोडी.येथून श्रीलंकेचे अंतर अवघे १८ मैल आहे व भारत श्रीलंकेमधील ही एकमेव स्थलसीमा आहे.
भारतातून श्रीलंकेचे दर्शन घडवणारे धनुषकोडी
हे पर्यटनस्थळ असणार असा अंदाज तुम्ही केला असेल तर तो अगदी बरेाबर आहे मात्र गेली काही वर्षे ही जागा ओसाड पडली आहे. सध्या या जागेची नोंद झपाटलेल्या जागांमध्ये केली गेली आहे त्यामुळे या ठिकाणी आजही पर्यटक जातात पण ते फक्त दिवसा. रात्री येथे जाण्यास बंदी आहे. तमीळनाडूच्या रामेश्वरम जिल्ह्यात हे ठिकाण आहे. तेथे जाण्यासाठी १५ किमीचा रस्ता पार करावा लागतो मात्र हा रस्ताही एकाकी व भीतीदायक आहे.
या जागेशी अनेक रहस्ये निगडीत आहेत. येथे आजही अनेक इमारतींचे भग्नावशेष आहेत. १९६४ च्या वादळात हे गांव उध्वस्त झाले. त्यापूर्वी हे तीर्थस्थळ म्हणूनही प्रसिद्ध होते. तेव्हा येथे हॉटेल्स, व अन्य बाजारपेठ होती व वस्तीही होती. तसेच सामान वाहतूक करण्यासाठी साप्ताहिक फेर्याही होत असत. असे सांगतात की रामरावण युद्धात रावणाचा भाऊ बिभिषण यांच्या सल्ल्यावरून रामाने त्याच्या धनुष्याच्या एका बाजूने येथील सेतू तोडून टाकला होता. त्यावरून त्याला धनुषकोडी असे नांव पडले. सध्या येथे भारतीय नौदलाची चौकी आहे.