आता कोण झाले बेहाल ?


आपल्या देशातले राजकीय पक्ष लोकांना काय वेडे समजतात की काय हे कळत नाही. त्यांचे निवडणुकीतले धोरण नेहमीच दुटप्पीपणाचे असते. भाजपा आणि शिवसेनेच्या अशा दुटप्पीपणाचा अनुभव मुंबईकर घेत आहेत. या दोन पक्षाचे नेते एकमेकावर तुटून तर पडत आहेत. पण दोघांत युती झाली तर त्यांना परस्परावर केलेले आरोप आणि केलेल्या टिप्पण्या गिळाव्या लागणार आहेत. मुंबईत युती झाली तरी इतर मनपात अशी युती नाही. म्हणजे काही ठिकाणी हे दोन पक्ष एकमेकांवर तुटून पडणार आणि काही ठिकाणी परस्परांचे वाभाडे काढणार. किती कसरत करावी लागेल? एखाद्या निवडणुकीत युती झाली आणि दुसर्‍या निवडणुकीत ती मोडली तर ते एकवेळ मान्य करता येईल. पण एकाच निवडणुकीत एका गावात दोस्ती तर दुसर्‍या गावात कुस्ती हा प्रकार हास्यास्पद वाटतोे.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसची अशीच गोची झाली होती. एकाच वेळी राहुल गांधी यांनी साम्यवाद्यांशी केरळात वैर मांडले होते तर बंगालमध्ये याच डाव्या आघाडीशी मैत्री केली होती. ते केरळात जात तेव्हा डाव्या आघाडीचे तत्त्वज्ञान कसे कालबाह्य झाले आहे हे पटवून देत असत पण लगेच दुसर्‍या दिवशी बंगालात जाऊन डाव्या आघाडीवर स्तुती सुमने उधळत असत. त्यांना आणि डाव्या आघाडीच्या नेत्यांनाही अशीच कसरत करावी लागत असे. बंगालात ते कॉंग्रेसचे मित्र होते पण लगतच्या त्रिपुरात ते आणि कॉंग्रेसचे नेते आमने सामने येत असत.

आता तर उत्तर प्रदेशात कॉंग्रेसवर वेगळेच संकट कोसळले आहे. एकाच निवडणुकीत निम्म्यातून त्यांना आपले धोरण बदलावे लागले आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने प्रचारात आघाडी घेतली. ब्राह्मण मतदार आपल्या डोळ्या समोर असल्याचे जाहीर केेले. शीला दीक्षित यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून जाहीरही केले. तिथली कॉंग्रेसची सत्ता जाऊन २७ वर्षे उलटली आहेत. या २७ वर्षात कधी समाजवादी पार्टी, कधी बसपा तर कधी भाजपा असे कॉंग्रेसचे तीनही विरोधक सत्तेवर येऊन गेले. कॉंग्रेस शिवाय कोणीच या राज्याचा विकास करू शकत नाही हे लोकांच्या मनावर ठसवण्यासाठी कॉंग्रेसने घोषणा तयार केली होती. ‘२७ साल, यूपी बेहाल’. आता कॉंग्रेसला निवडणुकीची रणधुमाळी प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर समाजवादी पार्टीशी युती झाल्यामुळे आपली ही घोषणा आणि ब्राह्मण मतदारांवर लक्ष केन्द्रित करणे या सगळ्या गोष्टी बदलाव्या लागत आहेत. त्या घोषणार्ंच्ंया फलकांचे आता काय करावे असा प्रश्‍न पडला आहे.

Leave a Comment