रा.स्व. संघाचा घातपात


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी काल एका चर्चासत्रात बोलताना पुन्हा एकदा आरक्षणावर बेजबाबदार विधान केले. ते विधान नेमके काय होते, त्यांना नेमके काय म्हणायचे होते याचा विपर्यास कसा केला गेला. मुळात मनमोहन वैद्य यांना जे काही म्हणायचे होते ते नेमके काय होते वगैरे गोष्टीवर आता खुलासे आणि स्पष्टीकरणे दिली जात आहेत. त्याला काही अर्थ नाही. मुळात आरक्षणाच्या विषयावर बोलताना फार व्यापक विचार करून बोलले पाहिजे याचे भान ठेवले गेले नाही हे मात्र खरे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी असेच विधान करून आपल्या बेजबाबदारपणाचे दर्शन घडवले होते. त्यांच्या त्या विधानाचा बिहारच्या निवडणुकीवर परिणाम होणार याची जाणीव नरेंद्र मोदींना झाली. म्हणून त्यांनी सरसंघचालकांच्या विधानावर खुलासे करताना बरीच आक्रमक भूमिका घेतली. कारण त्यांना सारवासारवच करायची होती.

भारतीय जनता पार्टी आरक्षणाच्या विरोधात नाही ती कधीही आरक्षण रद्द करणार नाही असे खुलासे त्यांनी निःसंदिग्धपणे केले. तरी बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांनी संघाचे बरेच वाभाडे काढले आणि संघाच्या लोकांना आरक्षणाचे वावडे असल्याचा प्रचार करून निवडणूक जिंकली. बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असा धडा मिळाल्यानंतर किंवा एकूणच आपण आरक्षणाबाबत सावधपणे बोलले पाहिजे एवढे भान संघाच्या नेत्यांना नाही. त्यामुळे ते वेड्यासारखे पुन्हा पुन्हा संदिग्ध विधाने करून पायावर धोंडे पाडून घेत आहेत. संघाचे नेते स्वतःला मोठे चाणाक्ष, मुरब्बी, चांगले संघटक म्हणून घेत असले तरी प्रत्यक्षात या सगळ्या गुणांचा त्यांच्यात अभाव असतो. संघाच्या नित्य कामाचा ठराविक कार्यक्रम सोडला तर जिवनाच्या व्यापक क्षेत्रामध्ये काय घडत आहे याची जाणीव त्यांना नसते. एवढेच नव्हे तर अशी जाणीव करून घेण्याची काही गरज नाही अशी त्यांची भावना असते. त्यामुळे ते असे उघडे पडतात. संघाची मंडळी आता आरक्षणाच्या बाबतीत या बोटावरची थुंकी त्या बोटावर करायला लागले आहेत. मुळात त्यांना आरक्षण हा विषय त्यांना नीट समजलेला नाही आणि आताच्या राजकारणाच्या विशिष्ट वातावरणात त्याचे महत्त्व काय आहे याची त्यांना कसलीच जाणीव नाही. समाजात जे लोक मागे पडले त्यांना पुढे आणण्यासाठी आरक्षण आहे हे योग्यच आहे अशा शब्दात ते आरक्षणाचे समर्थन करण्याचा प्रयत्न करतात.

परंतु मनात असून त्यांना आरक्षण पसंत नाही. त्यामुळे शब्दांच्या कसरती करायला लागतात आणि कुठेतरी एखादा शब्द असा काही बोलून जातात की तेच त्यांचे खरे मत असल्याचे लक्षात येते. मनमोहन वैद्य यांची अशीच नेमकी गोची झालेली आहे. देशात जे लोक मागे पडलेले आहेत त्यांना सर्वांच्या बरोबर आणण्यासाठी आरक्षण समर्थनीयच आहे. असे आता संघाच्या लोकांनी म्हणायला सुरूवात केलेली आहे. तसे म्हणणे राजकारणासाठी सोयीच आहे आणि त्यामुळेच दलित मागासवर्गीयांचा पाठिंबा भाजपाला मिळू शकतो हे त्यांच्या लक्षात आलेले आहे. इथंपर्यंत राजकीयदृष्ट्या ते बरोबर असते परंतु मनमोहन वैद्य हे काल त्यांच्या नकळत एक वाक्य बोलून गेले. आरक्षणामुळे देशात विघटनवाद वाढतो असे ते म्हणाले. एका बाजूला आरक्षण आवश्यकच आहे असे ते म्हणायचे आणि लगेच देशात आरक्षणाने विघटन होते असे म्हणून आपली वेगळी भावनाही व्यक्त करायची या अपरिपक्वपणामुळे सार्‍या भूमिकेलाच बट्टा लागतो.

संघाचा आरक्षणाला विरोध असेल तर संघाने तशी स्पष्टपणे तशी भूमिका घ्यावी. उगाच दुहेरी भूमिका मांडत बसू नये आणि संघाला खरोखरच आरक्षण समर्थन करायचे असेल तर त्यांनी खुशाल करावे पण त्यात परिपक्वता दाखवावी. पण या दोन्ही गोष्टी संघाला जमत नाही. संघाच्यावतीने बोलणारे लोक अतीशय अपरिपक्व आणि राजकीयदृष्ट्या पोरकट असतात त्यामुळे त्यांची वारंवार छिथू होते आणि त्याचे परिणाम भाजपाला भोगावे लागतात. मनमोहन वैद्य यांच्या विधानानंतर काही लोकांनी त्यांचे राजकीय विश्‍लेषण केले आहे ते पटणारे नाही. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी विजयी होऊ नये आणि मोठा विजय मिळवून वरचढ होऊ नये असे संघालाच वाटते. त्यामुळे मनमोहन वैद्य यांनी जाणीवपूर्वक हे विधान केले आहे असे राजकीय विश्‍लेषण काही पत्रकारांनी मांडलेले आहे. परंतु वास्तवात मनमोहन वैद्य असोत की मोहन भागवत असोत ते राजकारणात एवढे हुशार नाहीत. नरेंद्र मोदींनी मोठे होऊ नये यासाठी काही कारस्थाने करावीत एवढा चाणाक्षपणा त्यांच्याकडे नाही. उगाच बालीशपणे केलेल्या विधानातून त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा शोध लावावा एवढी काही गरज नाही. मुळात या लोकांची क्षमताच कमी असते. आपण काय बोलले पाहिजे, कसे बोलले पाहिजे यावर त्यांचे प्रभुत्व नसते. हिंदूंची संघटना करणे एवढ्या मर्यादित क्षेत्रातच सतत काम करत राहण्याने त्या क्षेत्राच्या बाहेर काय चालले आहे याविषयी त्यांच्या मनात प्रचंड अज्ञान असते. पण त्यातून आपण आपल्या संघटनेचे किती नुकसान करत असतो याचे भान त्यांना राहत नाही.

Leave a Comment