जगातील महागडा कुत्रा, किमत फक्त १४ कोटी


जगातील सर्वात महागडा कुत्रा म्हणून रेड तिबेटियन मस्टीफ जातीच्या बिग फ्लॅश नावाच्या कुत्र्याची नोंद झाली आहे. चीनमधील यांग नावाच्या कोळसा खाण मालकाने हा कुत्रा तब्बल १३ कोटी ६० लाख रूपयांना खरेदी केला आहे. या जातीची कुत्री मुळातच लक्षावधी रूपये किमतीची असतात मात्र या कुत्र्यांना विशेष प्रशिक्षण दिले गेले असेल तर त्यांच्या किमती कोट्यावधींमध्ये जातात. त्यात बिग फ्लॅश सर्वात महागडा ठरला आहे.

या कुत्र्यात सिहाचे रक्त असल्याचे मानले जाते. कारण ते दिसायला सिंहासारखे दिसतात. प्रत्यक्षात ते लांडग्याचे वंशज असून हा जनुकबदल हजारो वर्षांपूर्वी झाला असल्याचे मानले जाते. बिग फ्लॅशचे वजन ९०किलेा असून तो ११ महिन्याचा आहे. या कुत्र्यांचे आयुष्य ११ ते १४ वर्षे असते व त्यामुळे बिग फ्लॅशचे वजन व उंची आणखी वाढणार आहे. पूर्ण वाढीत तो १४५ किलोंचा व २ फूटांपेक्षा उंच होईल असे सांगितले जात आहे. नवीन मालक या कुत्र्याला पाहताक्षणीच त्याच्या प्रेमात पडला व कुत्राही मालकाच्या प्रेमात पडला. मालकाने बिग फ्लॅशसाठी मोजलेल्या किंमतीत पोर्शे ९११ ही महागडी कार खरेदी करता येईल.

मस्टीफ जातीच्या कुत्र्यात लाल रंगाचा कुत्रा चीनी लोक विशेष पवित्र मानतात. लाल रंग चीनमध्ये पावित्र्याचा रंग आहे. त्यामुळे या रंगाचा कुत्रा समृद्धी आणतो असा विश्वास आहे. बिग फ्लॅशसाठी आता मालकाला टनावारी चिकन, बीफची तसेच मोठ्या घराची व्यवस्था करावी लागेल. मात्र तो वयात आला की एका ब्रिडींगसाठी मालकाला १० हजार पौंडांपर्यंत रक्कम मिळू शकेल. या जातीच्या कुत्रीला एकावेळी ५ ते १२ पिले होतात. हा कुत्रा स्टेटस सिंबॉल म्हणूनही प्रसिद्ध आहे. किंग जॉर्ज चौथा, राणी व्हिक्टोरिया, चेंगिझखान यांच्याकडे या जातीची कुत्री होती. ही कुत्री अतिशय बुद्धीमान व प्रेमळ असतात असेही सांगितले जाते.

Leave a Comment