अशिक्षित लोकांना ‘डिजिटल’ करण्यासाठी सरकारचे नवे ऍप


नवी दिल्ली – केंद्र सरकारने गरिब आणि अशिक्षित लोकांना डिजिटल व्यवहार करता यावे, यासाठी ‘आधार पे’चा प्रचार-प्रसार सुरू केला आहे. ‘आधार पे’च्या माध्यमातून फिंगरप्रिंटच्या सहाय्याने व्यवहार करता येणार असून आधार पे हे आधीपासूनच आधार कार्डशी संलग्न असलेल्या पेमेंट यंत्रणेचे एईपीएसचे व्यापाऱ्यांसाठीची आवृत्ती (मर्चंट व्हर्जन) आहे.

पासवर्ड आणि पिनच्या मदतीने केल्या जाणाऱ्या ऑनलाईन आणि डेबिट-क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांची जागा ‘आधार पे’ घेणार आहे. या ऍपचा वापर सहजसोपा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या ऍपच्या माध्यमातून व्यवहार करताना लोकांना आधार नंबर, बँकेचे नाव आणि फिंगरप्रिंट द्यावे लागले. ‘आधार पे ऍप सर्व एँड्रॉईड फोनवर चालेल. यासाठी फक्त फिंगर बायोमेट्रिक डिव्हाईस जोडलेले असणे आवश्यक आहे. या ऍपच्या माध्यमातून डेबिट-क्रेडिट कार्ड आणि पिन नंबरशिवाय कॅशलेस व्यवहार करणे शक्य होणार आहे. त्यासाठी ग्राहकांकडे स्मार्टफोन असणे बंधनकारक आवश्यक असणार नाही, असे यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. पाण्डेय यांनी सांगितले आहे.

सरकारने आधार पे दुकानदारांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी बँकांच्या प्रत्येक शाखेला ३० ते ४० व्यापाऱ्यांना या सुविधेशी जोडण्याच्या सूचना केल्या आहेत. आतापर्यंत आंध्रा बँक, आयडीएफसी बँक, सिंडिकेट, एसबीआय आणि इंडसइंड बँक या पाच बँका ‘आधार पे’शी जोडण्यात आल्या आहेत. लवकरच इतरही अनेक बँका आधारे पेला जोडण्यात येणार आहेत. ‘आधार पे विषयी व्यापाऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे काम सुरू आहे. आधार पेच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी दुकानदारांना २ हजार रुपयांचे बायोमेट्रिक यंत्र विकत घ्यावे लागले. या यंत्राची किंमत व्यापाऱ्यांकडून हळूहळू वसूल करण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे. असे झाले तरच व्यापारी आधार पेच्या माध्यमातून व्यवहार करतील, असे सरकारला वाटते,’ अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे.

यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. पाण्डेय यांनी आधार पेच्या माध्यमातून होणारे व्यवहार सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. इतर डिजिटल व्यवहारांपेक्षा आधार पे जास्त सुरक्षित आहे. ग्राहक आणि व्यापारी यांची बँक खाती या व्यवहारांमध्ये संलग्न असतील. त्यामुळे याचा गैरवापर होण्याची शक्यता कमी आहे. फिंगरप्रिंटची नक्कल करणे अशक्य आहे. जर एखाद्या व्यापाऱ्याने फिंगरप्रिंटचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला, तर तो लगेच पकडला जाऊ शकतो. कारण या ऍपच्या माध्यमातून व्यवहार झालेल्या ठिकाणाची माहिती बँकेला मिळते,’ असे यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. पाण्डेय यांनी सांगितले.

Leave a Comment