केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये सूर्योपासना प्राचीन काळापासून केली जात आहे. भारतात सूर्याची अनेक मंदिरे आहेतच. त्यातील कोणार्कचे सूर्यमंदिर तर जगाच्या नकाशावर विराजमान झाले आहे. असेच एक कलात्मक मंदिर बिहारच्या औरंगाबाद येथील देव येथे असून ते आणखी एका विशेष कारणाने प्रसिद्ध आहे. देशातील सर्व सूर्यमंदिरे पूर्वाभिमुख आहेत मात्र हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. १०० फूट उंचीचे हे सूर्यमंदिर दीड लाख वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. कोणार्क मंदिराप्रमाणेच येथेही सूर्य रथ आहे.
या सूर्यमंदिराने रातोरात बदलली होती दिशा
या मंदिरातील सात रथांवर दगडात सुंदर कोरीवकाम व शिल्पे कोरली गेली आहेत. काळ्या पत्थरात उगवता, मध्यान्हीचा व मावळता सूर्य यांच्या अप्रतिम प्रतिमा आहेत. मंदिराचे शिल्प ओडिसाच्या जगन्नाथ मंदिराशी साम्य असलेले असून या मंदिराचे उल्लेख सूर्यपुराणात येतात. त्यातील कथेनुसार या मंदिराची लूट करण्यासाठी एक लुटारी टोळी आली तेव्हा मंदिरातील पुजार्यांनी मंदिर तोडू नका अशी विनवणी केली. तेव्हा लुटार्यांच्या पुढार्यासने या मंदिरात खरोखरच देव असेल तर त्याने त्याच्या शक्तीचा प्रत्यय द्यावा असे सांगून एक रात्रीची मुदत दिली. तेवढ्या काळात या मंदिराचे तोंड पूर्वकडून पश्चिमेकडे गेले तर मंदिर तोडले जाणार नाही असे तो म्हणाला.
पुजारी लोकांनी रात्रभर देवाची प्रार्थना केली व आश्चर्य म्हणचे दिवस उगवला तेव्हा हे मंदिर पश्चिमाभिमुख झाले होते. परिणामी लुटंरूंनी मंदिर पाडले नाही. यामुळे भारतीय मंदिर इतिहासात या मंदिराचे विशेष स्थान आहे.