नवी दिल्ली: आजच्या तरुणांच्या प्रथम पसंतीचे केंद्रस्थान असलेल्या रिलायन्स जिओ मोफत ऑफरचा कालावधी लवकरच संपत असून रिलायन्स जिओच्या मोफत सेवेचा शेवटचा कालावधी ३१ मार्च हा असून, त्यापूढे या सेवेसाठी शुल्क आकारले जाणार आहे.
फुकट जिओसाठी ३१ मार्चनंतर द्यावे लागणार पैसे?
याबाबत ‘इकॉनॉमिक टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार रिलायन्स जिओ ३१ मार्चनंतर लवकरच एक नवा प्लान जाहीर करत असून ज्यामध्ये मोफत सेवेसाठी प्रतिमहिना किमान १०० रूपये इतके शुल्क मोजावे लागण्याची शक्यता आहे. सध्या रिलायन्स जिओने जोरदार धमाका सुरू ठेवला आहे. मोफत इंटरनेट, अनलिमेटेड डेटा आणि फोरजी स्पीड यामुळे रिलायन्स जिओ अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. विशेषत: देशातील युवावर्गाला रिलायन्स जिओने खास भुरळ घातली आहे. त्यामुळे अर्थातच इतर मातब्बल टेलीकॉम कंपन्यांना धोबिपछाड बसला आहे.
सध्या रिलायन्स जिओ ग्राहकांना जी ऑफर देत आहे त्यानुसार, युझर्सना मोफत व्हाईस कॉल. मोफत ४जी डेटा मिळत आहे. शिवाय रिलायन्सने वेलकम ऑफरची मर्यादा वाढवून ग्राहकांना नववर्षाची आकर्षक भेटही दिली आहे. या योजनेला रिलायन्सने ‘हॅप्पी न्यू ईयर’ नाव दिले असून, ही ऑफर मार्च २०१७पर्यंत सुरू राहणार आहे. रिलायन्स जिओ सध्या भविष्यातील प्लानवर जोरदार काम करत असल्याचे वृत्त आहे. ही योजनाही रिलायन्स अत्यंत आक्रमकपणे लोकांपर्यंत पोहोचविण्याची शक्यता असून, नव्या प्लानसाठी ग्राहकांना १००रूपये इतके शुल्क भरावे लागू शकते. तसेच, एप्रिल ते जून महिन्यांदरम्यान यूझर्सना मोफत डेटा आणि मोफत कॉलसाठी १० रुपये चार्ज करु शकते.
दरम्यान, टेलीकॉम क्षेत्रातील मातब्बर कंपन्यांना रिलायन्सच्या पदार्पनातील धमाकेदार ऑफरमुळे जोरदार दणका बसला आहे. त्यामुळे या कंपन्यांनी ट्रायकडे जोरदार आक्षेप नोंदवला आहे. त्यावर टेलिकॉम रेग्युलेटर ‘ट्राय’ने भारताचे अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी मुकेश अंबानींच्या कंपनीकडून जिओच्या मोफत डेटा आणि मोफत कॉलिंग ऑफरवर स्पष्टीकरण मागवले आहे. यात महत्त्वाची गोष्ट अशी की, ९० दिवसांच्या वेलकम ऑफरनंतर ‘हॅप्पी न्यू ईयर’ ऑफरद्वारे मोफत कॉल आणि डेटा देण्याची घोषणा झाल्यानंतर ‘ट्राय’ने रिलायन्स जिओकडे आपले स्पष्टीकरण मागवले आहे.