साडेतीन लाखांहून अधिक लोकांनी राष्ट्रगीत गायनाचा बनवला जागतिक विक्रम


राजकोट – शनिवारी गुजरातच्या राजकोट जिल्ह्य़ातील कागवाड येथे एका कार्यक्रमात साडेतीन लाखांहून अधिक लोकांनी राष्ट्रगीत गाऊन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

हा कार्यक्रम या शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या खोडल धाम मंदिरात खोडियार देवीच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनिमित्त आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या निरीक्षकांच्या उपस्थितीत साडेतीन लाखांहून अधिक लोकांनी एकत्र राष्ट्रगीत गायले, असे खोडल धाम मंदिर ट्रस्टचे सदस्य हंसराज गजेरा यांनी सांगितले.

खोडियार देवी ही विशेषत: लेवा पटेल समाजासाठी वंदनीय आहे. यापूर्वी २०१४ साली बांगलादेशात २ लाख ५४ हजार ५३७ लोकांनी राष्ट्रगीत गाऊन विक्रम प्रस्थापित केला होता. हा विक्रम शनिवारी मोडल्याचे गजेरा म्हणाले.सर्वाधिक लांबीची (४० किलोमीटर) शोभायात्रा आणि १००८ कुंडांचा ‘महायज्ञ’ यांचे आयोजन करून ट्रस्टने लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सकरता दोन नवे विक्रमही प्रस्थापित केल्याचे गजेरा म्हणाले.

Leave a Comment