जगाच्या एका टोकावर असलेले शांत सुंदर फौला आयलंड


आजकाल शहरातून शांतता राहिलेली नाही तशीच खेड्यापाड्यातूनही ती नाहिशी होत आहे. अशावेळी चार सुखाचे आणि परमशांततेचे क्षण घालवायचे असतील तर अजून एक ठिकाण जगाच्या पाठीवर आहे. म्हणजे तशी ठिकाणे अनेक आहेत, पण राहण्याजेवण्याची तसेच निवासाची सुविधा होऊ शकते असे ठिकाण आहे अटलांटिक महासागरात. जगाच्या एका टोकावर स्कॉटलंडच्या शेटलँड द्विपसमूहाचा भाग असलेल्या फौला आयलंडला त्यासाठी भेट द्यावी लागेल.

पाच हजार वर्षे जुने असलेल्या या बेटावर निरव शांतता आहे. नाही म्हणायला समुद्राच्या लाटांची गाज ऐकू येते. या बेटावरील रहिवाशांची संख्या आहे ३०. पाच चौरस मैलाचा परिसर असलेले हे बेट इंटरनेट, टिव्ही, पोस्ट ऑफिस व लँडलाईनचा एक फोन बूथ असलेले आहे. येथील रहिवाशांना सामान आणायचे असेल अथवा आजारावर उपचार करायचे असतील तर शेजारी बेटांवर जावे लागते. अर्थात त्यासाठी हवाई सेवा आहे तसेच सागरीसेवाही आहे.


या बेटावर पर्यटक येतात आणि अगदी आनंदात त्यांची सुटी घालवितात. येथील स्थानिकही पर्यटकांचे अगत्याने स्वागत करतात, त्यांच्या मनोरंजनासाठी एकत्र येऊन खाणे, पिणे, मेजवानी यांची व्यवस्था करतात व परंपरागत पद्धतीने पाहुण्यांचे मनोरंजनही करतात. पर्यटनाबरोबरच येथे बकर्‍यापालन व्यवसायही केला जातो.

या बेटावर नाताळ जगापेक्षा तीन आठवडे उशीराने साजरा होतो कारण येथे अजूनही जुने कॅलेंडर वापरले जाते. नाताळनिमित्ताने घरी बनविलेल्या भेट वस्तूच दिल्या जातात. ब्रिटनमधील सर्वात उंच क्लिफ याच बेटावर आहे. तिला द केम असे म्हटले जाते. एक आहे, हे बेट अंटलाटिक महासागरात एका टोकाला असल्याने येथे हवा वारंवार खराब होते व वादळेही खूप होतात.

Leave a Comment