चीनमध्ये रोबोट पत्रकाराने लिहिली पहिली बातमी


एका रोबोट पत्रकाराने लिहिलेली पहिली बातमी चीनमध्ये प्रकाशित झाली आहे. एका चीनी दैनिकात त्याने 300 अक्षरांची बातमी लिहिली असून ती केवळ एका सेकंदात तयार झाली, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

झियाओ नान असे या यंत्रमानव पत्रकाराचे नाव आहे. तो लघुकथा आणि मोठे वृत्तांतही लिहू शकतो, असे अशा प्रकारच्या यंत्रमानवाचा विकास करणारे शास्त्रज्ञ वान झियाओजुन यांनी सांगितले. वान हे पेकिंग युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक आहेत.

झियाओने वसंत ऋतूच्या महोत्सवानिमित्त झालेल्या गर्दीच्या संबंधात बातमी लिहिली आहे.

“या वृत्तपत्राच्या अन्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत झियाओ नान याच्याकडे माहितीचे विश्लेषण करण्याची अधिक क्षमता आहे आणि बातमी लिहिण्याचा त्याचा वेगही अधिक आहे. मात्र म्हणून बुद्धिमान रोबोट लवकरच पत्रकारांची जागा पूर्णपणे व्यापतील, असे नाही ,” असे ते म्हणाले.

सध्या हे रोबोट समोरसमोर मुलाखती घेऊ शकत नाहीत, उत्तरावर स्वयंस्फूर्तपणे प्रतिपश्न करू शकत नाहीत आणि एखाद्या मुलाखतीतून किंवा संभाषणातून बातमीचा कोन शोधू शकत नाहीत, असे झियाओजुन यांनी सांगितले.

“मात्र लवकरच वर्तमानपत्रे आणि संबंधित माध्यमांमध्ये पूरक म्हणून रोबोट काम करू लागतील,” असे ते म्हणाले.

Leave a Comment