गूगल आणि अॅपल अॅप स्टोरमध्ये आशियाची पश्चिमेवर मात


गेल्या वर्षी म्हणजे 2016 साली आशियातील मोबाईल फोन वापरणाऱ्यांनी अॅप डाऊनलोड करण्याच्या बाबतीत युरोपीय वापरकर्त्यांवर मात केली, असे गूगल आणि अॅपलने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. मात्र 2016 साली भारतीय वापरकर्त्यांनी अमेरिका व ब्राझीललाही मागे टाकले असल्याची माहिती अॅप अॅनी नावाच्या संस्थेने प्रसिद्ध केली आहे.

गूगल प्ले-स्टोरवरून गेल्या वर्षी भारतातून जवळपास 6 अब्ज अॅप डाऊनलोड झाले आहेत. 2015 साली हीच संख्या 3.5 अब्ज एवढी होती. अॅप डाऊनलोड करण्याच्या बाबतीत भारताने अमेरीका आणि ब्राझीलला मागे टाकले, असे या संस्थेने म्हटले आहे.

याच अहवालात म्हटले आहे, की अॅपलच्या आयओएस अॅप स्टोरवरून कमाईमध्ये चीन हा पहिल्यांदाच सर्वात मोठा स्रोत बनला आहे. मात्र अॅपलच्या स्वतःच्या अहवालानुसार अमेरिका आणि जपानच्या तुलनेत चीनची बाजारपेठ अजूनही लहान आहे.

भारत हा 2016 साली जगातील दुसऱ्या क्रमांकाची स्मार्ट फोनची बाजारपेठ बनला आहे, असे संयुक्त राष्ट्राने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे. सध्या फक्त चीनमध्ये भारतापेक्षा अधिक स्मार्ट फोन वापरकर्ते आहेत.

2020 या वर्षाच्या शेवटापर्यंत गूगल प्ले-स्टोरवरून भारतात 20 अब्ज अॅप डाऊनलोड होतील आणि या यादीत भारत सर्वात वरच्या स्थानी जाईल, याची मोठी शक्यता आहे, असे अॅनी अॅप संस्थेचे अधिकारी पॉल बार्न्स यांनी बीबीसीला सांगितले.

भारतात गुगल प्ले आणि आयओएसवरून डाऊनलोड केल्या जाणाऱ्या अॅपमध्ये फेसबुक, व्हाट्सअॅप आणि यूसी ब्राऊजर यांचा क्रमांक सर्वात वरचा राहिला, तर कँडी क्रश, सबवे सर्फर्स आणि टेम्पल रन 2 हे सर्वाधिक डाऊनलोड केले गेलेले गेम्स ठरले.

Leave a Comment