इस्रो करणार विक्रम; फेब्रुवारीत १०३ उपग्रहांचे एकाच वेळी प्रक्षेपण


भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येत्या फेब्रुवारी महिन्यात एकाच वेळी 103 उपग्रहांचे प्रक्षेपण करून नवा विक्रम रचणार आहे. त्यातील केवळ तीन वगळता बाकी सगळे उपग्रह हे परदेशी आहेत, हे आणखी विशेष! आजपर्यंत कोणत्याही देशाने अशा प्रकारची कामगिरी केलेली नाही.

आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे प्रक्षेपण होणार आहे. यावेळी एकाच रॉकेटद्वारे 103 उपग्रह अवकाशात सोडण्यात येतील. त्यातील 100 हे परकीय असून त्यांमध्ये अमेरिका व जर्मनीचाही समावेश आहे.

इस्रोच्या लिक्विड प्रॉपल्शन सिस्टिम्स सेंटरचे संचालक एस. सोमनाथ यांनी सध्या चालू असलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या दुसऱ्या दिवशी खुल्या सत्रात ही माहिती दिली. “एकाच वेळी 100 पेक्षा जास्त उपग्रह सोडून आम्ही शतक गाठणार आहोत,” असे ते म्हणाले.

इस्रोने आधी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात 83 उपग्रह सोडण्याची योजना बनवली होती. मात्र त्यात 20 उपग्रहांची भर पडल्यामुळे हे प्रक्षेपण एक आठवडा दूर गेले आणि आता ते फेब्रुवारीत पार पडेल, असे सोमनाथ म्हणाले. मात्र यात नक्की किती देशांचे उपग्रह असतील, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

“हे अत्यंत लहान असे 100 उपग्रह असतील. पीएसएलव्ही (पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल) – सी37 या रॉकेटद्वारे त्यांचे प्रक्षेपण होईल. या रॉकेटचे वजन 1350 किग्रॅ असेल, त्यातील 500-600किग्रॅ वजन हे उपग्रहाचे असेल,” असे सोमनाथ म्हणाले.

गेल्या वर्षी इस्रोने 20 उपग्रह एकत्र सोडून विक्रम केला होता. एकाच वेळी सर्वाधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याचा मान रशियाकडे आहे. त्याने 2014 साली 37 उपग्रह प्रक्षेपित केले होते, तर अमेरिकेच्या नासाने 29 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत.

Leave a Comment