जग भटकलेला अवलिया जेम्स अॅक्विथ


पर्यटनाची आवड प्रत्येकालाच असते पण त्यातील किती जण प्रत्यक्षात भटक्या वृत्तीचे असतील हे सांगता येणार नाही. ब्रिटनचा जेम्स अॅक्विथ हा तरूण भटकंतीबाबत जगात अव्वल स्थानावर आहे. या तरूणाने वयाची गध्देपंचविशी येईपर्यतच जगातील सर्व १९६ देश पालथे घातले आहेत व आता अंटार्टिकावर भटकण्याची त्याची इच्छा आहे. जेम्स सध्या २८ वर्षांचा आहे. तो डॉयश बँकेत नोकरी करतो व पैसे साठवून प्रवासाला निघतो. त्याने पाच वर्षात जगभर प्रवास केला आहे. १८ व्या वर्षीच त्याने प्रवासाची सुरवात केली होती. व २४ वर्षे व १९२ दिवसांचे वय झाले तेव्हा त्याचे जगातील सर्व देश भटकून झाले होते.


लहान वयात जगातील सर्व देश पाहण्याचे गिनिज रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. इन्टाग्रामवर तीन महिन्यापूर्वी त्याने स्वतःचे अकौंट सुरू केले आहे व आत्तापर्यंत त्याचे ८४ हजार फॉलोअर्स आहेत. २०११ मध्ये तो सिरीयात होता व सिरीयातील शहरे अत्यंत सुंदर असल्याचे त्याने नमूद केले आहे. आज सिरीयातील सर्व शहरे बेचिराख झाली आहेत. त्याने जगभराच्या प्रवासासाठी आत्तापर्यंत १ लाख २५ हजार पौंड खर्च केले आहेत. ऑस्ट्रेलियापासून ते इराकपर्यंत व सॅन मटिनो पासून सर्बिया पर्यंत त्याची सर्वत्र भटकंती झाली आहे. जेम्स सांगतो मी भेट दिलेला पहिला स्वतंत्र देश व्हिएतनाम. प्रत्येक देशात तो कांही महिने मुक्काम करतो, तेथील स्थानिक लोकांशी मिळून मिसळून राहतो व पैसे कमी पडत असतील तर तेथेच बार अथवा दुकानातून काम करून गरजेनुसार पैसे मिळवतो. त्याने सहा महिने अफ्रिकेत काढले आहेत.

Leave a Comment