मुंबईचे उत्तर प्रदेश कनेक्शन


मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यात युती करण्यासाठी चर्चेचे गुर्‍हाळ जारी आहे. खरे म्हणजे या युतीचे दोघांनाही गरज आहे. शिवसेनेचे नेते कितीही गर्जना करत असले तरी स्वबळावर निवडणूक लढवून मुंबईची महानगरपालिका आपल्या ताब्यात पुन्हा घेता येईल की नाही याविषयी ते साशंक आहेत. म्हणजे मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवणे ही एक मोठी जोखीम आहे याची जाणीव शिवसेनेला आहे. म्हणून ते यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत दाखवला तसा अनाठायी ताठरपणा दाखवण्याच्या मनःस्थितीत नाहीत. त्यावेळी शिवसेनेने भाजपाला अगदीच अपमानाची वागणूक दिली होती. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीला त्यांनी आदित्य ठाकरेंना पाठवले होते आणि आपण भाजपाचा पाणउतारा करू शकतो हे दाखवून दिले होते. अर्थात त्यातून त्यांचा कसलाच फायदा झाला नाही. परंतु अशा गोष्टीतून कसलाच फायदा होत नसतो हे समजण्याइतका पोक्तपणा उध्दव ठाकरे यांच्याकडे त्यावेळी तरी नव्हता.

आता मात्र शिवसेनेने काही प्रमाणात नमते घेतलेले आहे. जागा वाटपाची रस्सीखेच सुरू असली तरी ती रस्सी तुटण्याइतकी ताणू नये एवढे भान शिवसेनेला आलेले आहे. एकदा मुंबई महापालिका हातातून गेली की शिवसेनेचा वाघ एकदमच नखे गळून गेलेल्या वाघासारखा होणार आहे. त्यामुळेच असेल कदाचित पण चर्चेची ओढाताण होऊनसुध्दा युती होण्याची शक्यता दिसत आहे. तसा विचार केला तर भाजपालासुध्दा मुंबई महानगरपालिकेमध्ये विजय मिळवणे अपरिहार्य ठरले आहे. ते जेवढे अपरिहार्य आहे. तेवढेच भाजपाला १०० टक्के शक्य वाटत नाही. नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये भाजपाने चांगले यश मिळवले असले तरी ते यश कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्याशी सामना करून मिळवले आहे. मुंबईतला सामना मात्र कॉंग्रेसशी नाही तो मुख्यत्वे शिवसेनेशी आहे. त्यामुळे तो आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवून जिंकूच अशी खात्री भाजपालाही वाटत नाही. असे असले तरी मुुंबईच्या निवडणुकीत आपला पराभव झाला आहे हे दिसता कामा नये याबाबत भाजपाचे नेते दक्ष आहेत. कारण मुंबईतल्या निकालाचे परिणाम उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीवर होतील अशी शक्यता त्यांना दिसत आहे. शेवटी काहीही झाले तरी मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि तिथल्या निवडणुकीच्या निकालाचे पडसाद उत्तर प्रदेशात उमटू शकतात.

यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे उत्तर प्रदेशातले बरेच लोक मुंबईमध्ये कामानिमित्ताने आलेले असतात. तेव्हा मुंबईतल्या निकालाचे केवळ पडसादच नव्हे तर परिणामसुध्दा उत्तर प्रदेशावर होऊ शकतात. भारतीय जनता पार्टीची मुंबईतल्या निवडणुकीतील वाटचाल तर घसरड्या जमिनीवरच्या वाटचालीसारखी चालूच आहे. पण उत्तर प्रदेशातसुध्दा त्याला बर्‍याच आव्हानांचा सामना करावा लागत आहे. तेव्हा उत्तर प्रदेशातला विजय निश्‍चित करण्यासाठी त्या राज्यात अनेक प्रकारचे डावपेच लढवण्याच्या बाबतीत भाजपाचे नेते सावध झालेले आहेतच तसेच ते मुंबईच्या बाबतीतसुध्दा सावध झालेले आहेत. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असताना त्या मतदानावर परिणाम करणारा कोणताही घटक भाजपाला प्रतिकूल नको आहे. मुंबईतला निकाल हा असाच एक घटक होऊ शकतो. म्हणून उत्तर प्रदेशावर नजर ठेवत असतानाच भाजपाची नजर आधी मुंबईवर लागलेली आहे. नाही तरी मुंबईची महानगरपालिका आता भाजप आणि शिवसेना या दोघांच्या हातात आहे. तेव्हा ती दोघांनी मिळून वाचवली तर दोघांवरचाही विश्‍वास वाढण्यास मदत होणार आहे.

मुंबईतल्या जागा वाटपाचा तिढा तसा पारंपरिकच आहे. कारण पाच वर्षापूर्वी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व दिसून आलेले आहे. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेपेक्षा जास्त जागा जिंकलेल्या आहेत. ज्या अर्थी विधानसभेच्या निवडणुकीत आपला प्रभाव अधिक दिसून आला आहे त्या अर्थी आता महानगरपालिकेच्या निवडणुकीतही आपल्या वाट्याला जास्त जागा आल्या पाहिजेत असे भाजपा नेत्यांना वाटते. प्रत्यक्षात शिवसेनेच्या नेत्यांना हे मान्य नाही. कारण विधानसभेच्या निवडणुकीतल्या यशाच्या जोरावर महानगरपालिकेच्या जास्त जागा मागणे हे त्यांना सयुक्तिक वाटत नाही. प्रत्येक निवडणूक वेगळ्या मुद्यावर होत असते. प्रत्येक निवडणुकीतले विषय वेगळे असतात. पणाला लागलेले प्रश्‍न वेगळे असतात तेव्हा विधानसभेच्या निवडणुकीतल्या निकालाचा न्याय महानगरपालिकेला लावला जाऊ नये असा शिवसेनेचा युक्तिवाद आहे. तो योग्य की अयोग्य यावर चर्चा करण्यात काही मतलब नाही कारण एकाच आघाडीतल्या किंवा युतीतल्या दोन घटक पक्षांचे जागा वाटप असे कधीच फार तार्किक आधारावर होत नसतात. आज शिवसेना असा न्याय लावण्यास तयाार नसली तरी त्याच्या आधारावर शिवसेनेने मागे जास्त जागा मागून घेतलेल्या आहेत.

Leave a Comment