अमेरिकेतील इलिनॉईस राज्यात केसी नावाचे एक चिमुकले शहर आहे. या शहराची नोंद गिनिज बुकमध्ये केली गेली आहे. या शहराचे क्षेत्रफळ जेमतेम २ चौरस मैलांचेच आहे व लोकसंख्या आहे साधारण ३ हजार. मात्र या चिमुकल्या शहरात मानवनिर्मित प्रचंड मोठ्या अनेक वस्तू आहेत. या वस्तूंमुळेच या शहराचे नांव गिनिज बुकमध्ये नोंदले गेले आहे. या शहरात अशा प्रचंड आकाराच्या वस्तू बनविण्यामागे असलेले कारण मजेशीर आहे.
या छोट्याशा शहरात आहेत प्रचंड मोठ्या वस्तू
साधारण २००० सालात अमेरिकेतील मंदीचा फटका या गावालाही बसला व येथील अर्थव्यवस्था कोसळली. तेव्हा गावातील जिम बोलीन नावाच्या व्यक्तीला एक कल्पना सुचली. गावातील आर्थिक व्यवहार वाढण्यासाठी गावात कांही आकर्षणे निर्माण केली गेली पाहिजेत ज्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतील व पैसा खेळता राहिल या उद्देशाने त्यांनी प्रचंड आकाराच्या वस्तू बनविण्याची सुरवात केली. त्यातून जगातील सर्वात मोठ्या आकाराची लाकडी आरामखुर्ची, जगातील सर्वात मोठे बूट, सर्वात मोठा पिंजरा, सर्वात मोठी पेन्सिल इतकेच काय पण जगातील सर्वात मोठ्या आकाराच्या स्वेटर विणण्याच्या लाकडी सुया यांची निर्मिती केली गेली.
यामुळे गावाचा उद्देश साध्य झाला. खरोखरच या गावात पर्यटकांची वर्दळ वाढली आजही या गावात अशा मोठमोठ्या आकाराच्या विविध वस्तू बनविण्याचा सिलसिला सुरूच आहे. जागतील सर्वात मोठी लाकडी फूटपट्टीही याच गावात आहे.