देशात काल दोन घटना अगदी योगायोगाने घडल्या. एक सलमानच्या संबंधात आणि दुसरी तामिळनाडूतल्या बैलाच्या खेळाबाबत. तसा या दोन घटनांचा परस्परांशी काही संबंध नाही पण आपला मुक्या प्राण्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे हे स्पष्ट करण्याचा एक सामान्य मुद्दा दोन घटनांत गुंतलेला आहे. सलमानखान हा आघाडीचा अभिनेता आणि लोकप्रिय कलाकार पण त्याने राजस्थानात काही हरणांची आणि दुर्मिळ प्राण्यांची बेकायदा शिकार केलेली आहे. गेल्या १८ वर्षांपासून त्याच्या विरोधात अनेक खटले जारी आहेत. तो कमालीचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा, मस्तवाल आणि दारुड्या आहे. त्याने नशेत आणि मस्तीत जे काही उद्योग केले त्यामुळे त्याच्या विरोधात खटले आहेत. पण तो पैसेवाला आहे आणि आपल्यावर कितीही गंभीर गुन्हे असले तरीही न्यायालयात शेवटपर्यंत लढण्यासाठी त्याच्या कडे वकिलांची फौज उभी करण्याची ताकद आहे. त्यामुळे एवढी वर्षे त्याच्यावर खटले चालू असतानाही तो तांत्रिक मुद्याच्या आधारावर मोकळा सुटत आला आहे. काल त्याच्या विरोधातल्या एका खटल्याचा निकाल दिला गेला.
मुकी बिचारी…
सलमानखान याने हरिणाची शिकार केली आहे पण त्याने ती शिकार बेकायदा शस्त्राच्या साह्याने केली आहे की वैध शस्त्रांच्या साह्याने केली आहे यावर वाद जारी होता. त्याने ज्या दिवशी शिकार केली त्या दिवशी त्याच्या हातातल्या शस्त्राची मुदत संपली होती त्यामुळे त्याचे ते शस्त्र त्या दिवशी अवैध ठरत होते. हा अगदी सामान्य ज्ञानाने समजून घेण्याचा विषय आहे. पण त्याला काल ज्या न्यायाधीशांनी निर्दोष ठरवले त्यानी परवान्याची मुदत संपली याचा अर्थ ते शस्त्र अवैध ठरते असा होत नाही. परवाना जारी होता पण त्याचे नूतनीकरण करण्याचे काम केवळ राहिले होते. पण नूतनीकरण झाले नाही म्हणून संबंधित अधिकार्यांनी ते शस्त्र बेकायदा जाहीर केले नव्हते आणि त्याचा परवाना काढूनही घेतला नव्हता त्यामुळे तो परवाना चालूच आहे असे मानावे असा निर्वाळा या न्यायाधीशांनी दिला. या आधी याच संबंधात १२ न्यायाधीशांनी सुनावणी केली होती. पण त्यांनी असा निर्णय दिला नाही म्हणजे हा खटला मुळातच चुकीच्या कलमावर चालला होता असेही या न्यायाधीशांनी म्हटले. आता या प्रकरणात ११ न्यायाधीश खरे की तेरावे खरे असा प्रश्न पडतो. कारण परवाना नूतनीकरण करण्याची मुदत संपल्यावर परवाना आपोआपच रद्द होत असतो हा साधा नियम आपल्याला माहीत आहे. आपण न्यायाधीशांच्या निकालावर टिप्पणी करू शकत नाही पण त्यांचा हा मुद्दा योग्यच आहे असे समजले तरी प्रश्न उरतोच.
न्यायालयीन कामकाजात असे तांत्रिक मुद्दे उपस्थित करून न्याय कसा लांबवला जातो याचे हे उदाहरण आहे. खरे तर मूळ खटला हरिणाची शिकार केलीय की नाही असा आहे. ती शिकार वैध शस्त्राने केलीय की अवैध यावरच १८ वर्षे जात असतील तर न्यायाच्या घरी किती विलंब असतो असा प्रश्न पडेल. येथे पैसेवाले जिंकतात. एखादा शेतकरी असा खटला लांबवत जातो तेव्हा तन मनाने लुबाडला जातो. वकिलांंची फी भरून उद्ध्वस्त होतो. अशी अनेक कुटुंबे कोर्टबाजीत खचलेली असतात. पण सलमानखानचे तसे होत नाही. तो कायद्याचा कीस पाडणारे कितीही वकील कामाला लावतो तरी त्याच्या अमाप संपत्तीचा एक कोपराही खरवडला जात नाही. शेवटी न्याय त्याच्या सारखा होईपर्यंत तो लढू शकतो. पण या प्रकरणात त्या हरणांची बाजू कोण मांडणार ? त्याला न्याय कधी मिळणार? त्यांच्या हत्या झाल्या तर केवळ कायदा तसा आहे म्हणून खटला दाखल होतो. कोणाच्या तरी शिकारीच्या शौकापायी मुक्या प्राण्योचे जीव गेले म्हणून खरीच हळहळ कोणाला वाटणार आहे?
तामिळनाडूतल्या जल्लीकट्टु या साठमारीच्या खेळाचा प्रकारही असाच आहे. या खेळात मुक्या जीवांचे शोषण होते. त्यांना अमानुषपणाला सामोरे जावे लागते. म्हणून त्यांच्या रक्षणार्थ काही प्राणी मित्र न्यायालयात गेले आणि तिथे न्यायालयाने या अमानुष खेळावर बंदी घातली. मात्र या खेळाची परंपरा जुनी आहे या एका मुद्यावर तामिळनाडूतले तरुण रस्त्यावर उतरून खेळावरची बंदी उठवण्याची मागणी करीत आहेत. काही तरुणांनी तर या मागणीसाठी स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. लाखो लोक या मागणीसाठी चेन्नईत आले आहेत. जनावरांना अमानुष वागणूक देणारा खेळ हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असे या लाखो लोकांचे म्हणणे आहे. न्यायालयाला हे मान्य नाही आणि न्यायालयाची या बाबतची भूमिका योग्यच आहे. परंपरा जुनी आहे म्हणून जनावरांना छळणे हा आपला हक्क आहे असे कोणाला वाटत असेल तर मुक्या जीवांनाही सुखाने जगण्याचा अधिकार आहे की नाही असा प्रश्न त्यांना विचारावा लागेल. परंपरा हा काय प्रकार आहे आणि अशी परंपरा कायम रहावी असा आग्रह आपण एकविसाव्या शतकातही धरत असू तर आपल्याला आधुनिकता म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल. न्यायालय आणि प्राणी मित्र आज मुक्या जीवांच्या बाजूने उभे आहेत पण आपल्या समाजाचा दृष्टीकोन तसा नाही. आपल्या करमणुकीसाठी मुक्या प्राण्यांचे कितीही हाल झाले तरी चालतील असा त्यांचा निर्दयीपणाचा दृष्टीकोन आहे.