मादाम तुसॉं म्युझियममध्येही ओबामांच्या जागी ट्रम्प


लंडन – येथील जगप्रसिद्ध असलेल्या मादामा तुसॉं म्युझियमध्ये अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांच्या जागेवर बसविण्यात आला आहे. म्युझियममधील डोनाल्ड ट्रम्प यांच्या मेणाच्या पुतळ्याचे नुकतेच अनावरण करण्यात आले. उन्हामुळे टॅन झालेली त्वचा आणि विशिष्ट पद्धतीने विंचरलेले केस दाखविण्यत आले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुतळ्याचा फोटो म्युझियमच्या ट्विटर हॅण्डलवर शेअर करण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या पुतळ्याला निळ्या रंगाचा सूट, पांढरा शर्ट आणि लाल टाय परिधान केलेला आहे. हा पुतळा व्हाईट हाऊसमधील ओव्हल ऑफिसप्रमाणे असलेल्या सेटअपमध्ये ठेवण्यात आला आहे. हा पुतळा 20 कलाकारांनी साकारला असून यासाठी सुमारे सव्वा कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

नोव्हेंबर-2016मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी अविश्‍वसनीय विजय मिळविला होता. त्यानंतर ते आता अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. मादाम तुसॉं म्युझियमच्या ओव्हल ऑफिस सेटअपमध्ये ट्रम्प यांचा पुतळा ठेवल्यानंतर तिथून अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांचा पुतळा हटवला आहे. 20 जानेवारीपासून डोनाल्ड ट्रम्प सत्तेत असेपर्यंत लोकांना त्यांचा पुतळा पाहायला मिळणार आहे. या संग्रहालयात डोनाल्ड ट्रम्प यांच्याशिवाय रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन, ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री बोरिस जॉन्सन यांचाही पुतळा आहे.

Leave a Comment