भारतीय ‘मेमरी गर्ल’चा विश्वविक्रम


मथुरा – आपल्या असामान्य स्मरणशक्तीच्या जोरावर मथुरामधील ‘मेमरी गर्ल’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रेरणा शर्माने ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे. फक्त १९ वर्षांची असलेली प्रेरणा हिची स्मरणशक्ती चकित करून सोडणारी असून तिने ५०० वेगवेगळे आकडे लक्षात ठेवले आणि फक्त ८ मिनिटे ३३ सेकंदात तिने ते उलट आणि सुटल क्रमाने अगदी अचूक सांगितल्यामुळे तिच्या नावाची नोंद आता गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

गेल्याच वर्षी तिच्या नावाची ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ आणि ‘एशियाई रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली होती. त्यामुळे ही मेमरी गर्ल चर्चेत आली होती. पण यंदा मात्र कॅनडामधील अरविंद पशुपतिचा रेकॉर्ड मोडत तिच्या नावे नवा विश्वविक्रम जमा झाला आहे. २७० वेगवेगळे आकडे अरविंदने लक्षात ठेवले होते. याआधीही तिने एकाचा रेकॉर्ड मोडला होता.

एका फलकावर दिलेले आकडे ठराविक वेळेत प्रेरणाला दाखवण्यात आले. हे सर्व आकडे प्रेरणाने लक्षात ठेवले. त्यानंतर हा फलक हटवण्यात आला. आधी क्रमाने तिने आकडे सांगितले त्यानंतर उलट क्रमाने देखील तिने हे आकडे सांगितले. हे सगळे आकडे तिने ८ मिनिटे ३३ सेकंदात अगदी अचूक सांगितले त्यामुळे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिच्या नावाची नोंद झाली आहे.