सध्या एका प्रकल्पावर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) संयुक्तपणे काम करत असून या प्रकल्पामुळे अंतराळात वापरली जाणारे तंत्रज्ञान जमिनीवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये वापरले जाऊ शकते. या प्रकल्पांतर्गत एका गाडीवर हा प्रयोगदेखील करण्यात आला असून हा प्रयोग यशस्वी झाला आहे.
पृथ्वीवरील वाहनात अंतराळात वापरले जाणारे तंत्रज्ञान
लिथियम ऑयन बॅटरी तंत्रज्ञानाच्या आधारे जमिनीवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती करण्याच्या तयारीत इस्रो आणि एआरएआय आहेत. इस्रो आणि एआरएआय ही माहिती एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. हे तंत्रज्ञान जर यशस्वी ठरले तर इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या क्षेत्रात क्रांती होऊ शकते. या तंत्रज्ञानावर चालणारे एक मॉडेल रस्ते आणि राज्यमार्ग सचिव संजय मित्रा यांना दाखवण्यात आल्याची माहिती इस्रो आणि एआरएआयच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. अंतराळ क्षेत्रातील तंत्रज्ञान रस्त्यांवर चालणाऱ्या वाहनांमध्ये वापरल्यास तो मैलाचा दगड ठरेल, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
अंतराळातील तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयोग इस्रो आणि एआरएआयने ज्या गाडीमध्ये केला, त्या गाडीमध्ये ४८ वोल्ट आणि ५० ऍम्पियरची बॅटरी लावण्यात आली होती. प्रयोगासाठी वापरण्यात आलेली गाडी २ तासांच्या चार्जिंगनंतर ९० किलोमीटर चालू शकते. ही गाडी ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने रस्त्यावर धावू शकते.