नवी दिल्ली – गरिबांच्या सामाजिक सुरक्षीततेला प्राधान्य देत केंद्र सरकार जनधन खातेदारांना तीन वर्षांचा 2 लाखापर्यंत मोफत जीवन विमा देणार आहे. देशभरात जनधन योजनेतंर्गत 27 कोटी बँक खाते उघडण्यात आले आहेत.
जनधन खातेदारांना मिळणार मोफत विमा
यातील 16 कोटी खाते आधार कार्डाशी जोडण्यात आले आहेत. या मोफत विमा योजनेनुसार अपघात आणि जीवन विमा कवच दोन्ही दिल्यास सरकारवर 9 हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
एका सरकारी अधिकार्याने सांगितले की, याबाबत अनेक प्रस्तावांवर विचार सुरू आहे. यापैकी एक विमा योजना अशी आहे, ज्यात तीन वर्षांपर्यतचा प्रीमियम सरकार भरणार आहे. 2014मध्ये केंद्राने तीन सामाजिक सुरक्षा योजना सुरू केल्या होत्या. यात पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय), पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय) आणि अटल पेंशन योजना (एपीवाय) यांचा समावेश आहे. अर्थमंत्रालयाच्या मते 3.06 कोटी नागरिकांनी पीएमजेजेबीवाय आणि 9.72 कोटी जणांनी पीएमएसबीवाय योजनेचा लाभ घेत आहेत.
या नवीन योजनेंतर्गत सरकार जीवन आणि अपघात विमा या दोन्हीचा प्रीमियम देऊ शकते. तर जनरल विमा योजना सर्व जनधन खातेदारांना लगेच लागू करू शकते. तसेच दुसरी योजना अशी आहे की, अटल पेंशन योजनेत सहभागी झालेल्यांचा अर्धा प्रीमियम सरकार भरणार आहे. यासाठी दरवर्षी 1 हजार रुपयांचा प्रीमियम राहील. यात 2019-20पर्यंत पॉलिसीहोल्डरला संरक्षण मिळणार आहे.