अति दुर्मिळ बाँबे ब्लडग्रुप


किती अंतर जायचे, किती वेळ लागणार याची पर्वा न करता बोलावणे येईल तेथे हातातली कामे टाकून रक्तदान करण्याचे व गरजू व्यक्तीला जीवनदान देण्याचे पुण्यकर्म करणारे अमिताभकुमार, तरूण व्यावसायिक विनय टोप्पो यांच्या विषयी आपल्याला काही माहिती आहे? नसेल तर हे जरूर वाचा. कारण या दोघांबरोबरच असे अंदाजे १५० जण आहेत ज्यांचा रक्तगट अतिशय दुर्मिळ आहे. हा रक्तगट आहे बाँबे ब्लडग्रूप.

नेहमीच्या रक्तगटापेक्षा हा वेगळा रक्तगट आहे. याला बाँबे नांव दिले गेले ते डॉ. एम.आर भेंडे यांनी १९५२ मध्ये या रक्तगटाचा शोध मुंबईत लावला त्यावरून. माणसाच्या बाकी सर्व रक्तगटात अँटिजेन एच असते मात्र या रक्तगटात ते आढळत नाही. आकडेवारीनुसार जगभरात दर दहा लाख लोकांमागे केवळ चार जणांत हा रक्तगट आढळतो. या गटाचे रक्त अन्य कोणत्याही रक्तगटाला चालू शकते मात्र या रक्तगटाच्या माणसाला रक्ताची गरज असेल तर ती फक्त याच रक्तगटाचा माणूस पुरी करू शकतो कारण अन्य गटाचे रक्त त्यांना चालत नाही. यामुळे देशभरात कधीही कुठेही इमर्जन्सी आली की देशाच्या कुठल्याही भागातून हे रक्तदाते एक जीव वाचविण्यासाठी जातात. कारण त्यांना माहिती असते की आपण जर यांना रक्त दिले नाही तर संबंधित गरजू दुसर्‍या कुणाचेच रक्त घेऊ शकणार नाही.

जमशेदपूरचे अमिताभकुमार व रांचीचे विनय टोप्पो नुकतेच कोलकाता येथे जाऊन १-१ युनिट रक्त देऊन आले व त्यानंतर लगोलग यांना मेघालयच्या शिलाँगमधील नवजात जुळ्या मुलींना रक्त देण्यासाठी धाव घ्यावी लागली. आता या जुळ्या बालिका धोक्याबाहेर आहेत. फेडरेशन ऑफ इंडियन डोनर्स असो.चे महासचिव विश्वस्वरूप सांगतात, भारतात या रक्तगटाचे साधारण १५० लोक आहेत. त्यामुळे त्यांना कधीही रक्तदान करण्याची परवानगी नाही. जेव्हा गरज निर्माण होईल तेव्हाच ते रक्तदान करू शकतात. त्यांना रिझर्व्ह डोनर्स असे म्हणतात. विश्वस्वरूप यांच्या संस्थेचे ध्येय असे आहे की भारताला त्या ५९ देशांच्या यादीत स्थान द्यायचे जेथे रक्त मिळाले नाही या कारणाने कधीही कुणाचा प्राण जात नाही.

Leave a Comment