एन डी तिवारी चर्चेत


कॉंग्रेसचे ज्येष्ठ आणि वयोवृद्ध नेते नारायणदत्त तिवारी यांना भाजपात प्रवेश देण्यात आला असल्याच्या बातम्या झळकल्या खर्‍या पण भाजपाने खुलासा केला असून तिवारी यांना नाही तर त्यांच्या मुलाला भाजपात घेतले असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांचा हा मुलगा रोहित शेखर तिवारी हा वकील आहे. तो नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा असला तरीही तिवारी यांनी त्याचे पितृत्व नाकारले होते. शेवटी रोहित याने प्रदीर्घकाळ न्यायालयात लढा देऊन तिवारी हे आपले वडीलच आहेत हे सिद्ध केले आणि तसे आपल्या या बापाला मान्य करायला लावले. तिवारी हे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात १९७६ ची आणीबाणी जशी शंकरराव चव्हाण यांनी इमाने इतबारे राबविली तशीच ती तिवारी यांनी उत्तर प्रदेशात राबविली होती आणि तिच्यावरून ते बदनामही झाले होते.

उत्तर प्रदेशाचे विभाजन होऊन उत्तरांचल राज्य निर्माण झाले तेव्हा तिवारी त्याही राज्याचे मुख्यमंत्री होते. १९९५ साली कॉंग्रेसमध्ये नरसिंहराव यांची चलती होती आणि त्यांनी कारस्थाने करून सोनिया गांधी यांचा कॉंग्रेस प्रवेश रोखून धरला होता तेव्हा तिवारी यांनी अर्जुनसिंग यांच्या साह्याने सोनिया कॉंग्रेस हा पक्ष स्थापन केला होता. पुढे सोनिया गांधी कॉंग्रेसच्या अध्यक्षा झाल्या तेव्हा तिवारी यांनी आपला पक्ष गुंडाळून ठेवला. ते कॉंग्रेसमध्ये आले आणि त्यांना सोनिया निष्ठेचे बक्षिस म्हणून आंध्राचे राज्यपाल केले गेले पण तिथे त्यांचे सेक्स स्कँडल गाजले. त्यामुळे ते या पदावरून आणि राजकारणातूनच निवृत्त झाले. मुलाच्या प्रकरणातही त्यांची खूप बदनामी झाली.

या सार्‍या गोष्टी भाजपा नेत्यांना माहीत आहेत म्हणून त्यांनी एनडीतिवारी यांना प्रवेश दिलेला नाही तर त्यांच्या मुलाला दिला आहे. मुलगा हा निमित्त आहे. प्रत्यक्षात हा नारायणदत्त तिवारी यांचाच प्रवेश आहे. या प्रवेशाने उत्तराखंडातली भाजपाची स्थिती सुधारली आहे. तिथे या पूर्वीच कॉंग्रेसचे आणखी एक माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. हे केवळ दोन माजी मुख्यमंत्री नाहीत तर उत्तराखंडाच्या राजकारणातली दोन मोठी प्रस्थे आहेत. विशेष म्हणजे तिवारी आणि बहुगुणा हे दोघेही सोनिया गांधी यांचे निकटवर्ती समजले जात होते. पण त्यांना भाजपात आणून भाजपा नेत्यांनी उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मोठी फिल्डिंग केली असून आपला विजय निश्‍चित केला आहे. तिवारी यांना पक्षात घेणे नैतिकदृष्ट्या कितपत योग्य आहे यावर चर्चा होऊ शकेल पण त्याचा पक्षाला फायदा होणार हे नक्की.

Leave a Comment