नवी दिल्ली – आरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांना नोटाबंदीच्या मुद्द्यावरून बुधवारी संसदीय समितीनी प्रश्नांचा भडिमार केल्यानंतर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी हस्तक्षेप करत त्यांचा बचाव केला. डॉ. सिंग म्हणाले, तुम्हाला सर्वच प्रश्नांचे उत्तरे देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे संसदीय समितीतील सदस्यांचा उर्जित पटेल यांच्यावरील रोख कमी झाला.
मनमोहनसिंग बनले उर्जित पटेल यांचे संकटमोचक
नोटाबंदीच्या विषयावर उर्जित पटेल, बँक आणि अर्थ मंत्रालयाच्या काही अधिकार्यांची संसदीय समितीसमोर चौकशी सुरू होती. यावेळी संसदीय समितीतील सदस्यांनी पटेल यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. बँकिंग प्रणालीची व्यवस्था सर्वसामान्य कधी होणार आणि 50 दिवसांच्या कालावधीमध्ये किती जुन्या नोटा जमा झाल्या, यासारखे प्रश्न विचारले. ज्याचे उत्तर उर्जित पटेल यांना देता आले नाही.
समितीच्या सदस्यांकडून पटेल यांच्यावर आणखीन प्रश्न विचारले जाण्यापूर्वीच डॉ. मनमोहनसिंग यांनी हस्तक्षेप केला. ते म्हणाले की, एका केंद्रीय बँक आणि गर्व्हनर पदाचा सन्मान राखला गेला पाहिजे. रिझर्व्ह बँक आणि तिचे गर्व्हनर यांची स्वायत्तता लक्षात घेऊन त्यांच्यावर दोषारोपण केले जाऊ नये, अशी मवाळ भूमिका त्यांनी घेतली. विशेष म्हणजे, डॉ. मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत नोटाबंदीच्या आपल्या भाषणात याला ऐतिहासिक विफलता आणि संघटीत लुट असल्याचे सांगत तीव्र टिका केली होती.