आयकर विभागाची राज्यभरातील ६४ ज्वेलर्सवर छापेमारी


पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात रोकड भरण्याबाबत निर्बंध लावले होते. राज्यभरातील १६ शहरांतील जवळपास ६४ ज्वेलर्सवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. बुधवारी सकाळी सुरू केलेली आयकर विभागाची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती, अशी माहिती सूत्रांकडून समजते. नोटाबंदीनंतर काळ्याचे पांढरे केल्याच्या संशयातून या ज्वेलर्सची चौकशी करण्यात आली आहे. पुण्यात आणि नाशकात काही महत्त्वाच्या ज्वेलर्सवर छापाही घालण्यात आला आहे.

याबाबत पुण्यातील आयकर विभागाच्या मुख्य कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील १३ ज्वेलर्सची चौकशी करण्यात आली. तसेच नागपूरच्या ९, नाशिकच्या ७, ठाण्यात ५, कल्याणमध्ये ५, सोलापूरमध्ये ५, अकोल्यात ४ ज्वेलर्सवर आयकर विभागाने कारवाईचे शस्त्र उपसले आहे. यात नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणावर कॅश डिपॉझिट झालेल्या ज्वेलर्सना आयकर विभागाने रडारवर घेतले आहे. त्यात पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अमरावती, वर्धा, अकोला, नाशिक, खामगाव, पालघर, वसई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, भाईंदर आणि डोंबिवलीतील ज्वेलर्सचा समावेश आहे. यात पुण्यातील सर्वाधिक म्हणजेच १३ ज्वेलर्सचा समावेश आहे.

आयकर विभागाने पुण्यातील रांका ज्वेलर्सच्या ३० कोटींच्या कॅश ट्रान्झक्शन्सची तपासणीही केली आहे. आयकर विभागाने बुधवारी ज्वेलर्सवरील कारवाईला सुरुवात केली. यात ज्वेलर्सच्या सर्व अकाऊंट्सची तपासणीही करण्यात आली. आयकर विभागाने सुरु केलेली ही कारवाई आजही सुरु राहणार आहे. दरम्यान नोटाबंदीनंतर सोन्याची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली होती. चढ्या भावाने सोने विकलेल्या ज्वेलर्सची चौकशी करणार असल्याचे आयकर विभागाने यापूर्वीच सांगितले होते.

Leave a Comment