आता पार्किंगही शोधणार गुगल मॅप


नवी दिल्ली: आता गाडीसाठी पार्किंगची जागाही आपल्याला रस्ते दाखविणारे गुगल शोधणार असून सध्या कोणतीही गोष्ट गुगलमुळे चुटकीसरशी शोधता येते, अगदी एखाद्या जवळच्या पत्त्यापासून ते जगभरातल्या विमानांच्या वेळाही गुगल आपल्याला दाखवतो. आता गुगल मॅप्सच्या साह्याने युजर्सना ते जात असलेल्या ठिकाणच्या पार्किंगच्या स्थितीची माहितीही मिळणार आहे.

ही सुविधा सध्या गुगल मॅप्सचे व्ही.९.४४ बेटा व्हर्जन वापरणाऱ्या युजर्सना उपलब्ध आहे. ती लवकरच सर्व युजर्सना उपलब्ध होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु ही सुविधा सध्या काही ठराविक ठिकाणांसाठीच उपलब्ध असेल. हळूहळू ती सर्वत्र उपलब्ध होईल व तुम्ही कुठेही गेलात तरी पार्किंगची चिंता तुम्हाला सतावणार नाही. यामध्ये लिमिटेड, मीडियम आणि इझी असे तीन प्रकार गुगल मॅपमध्येच ‘पी’ या नव्या आयकॉनसमोर फ्लॅश होणार असून, यामुळे इच्छितस्थळी पार्किंगची स्थिती युजर्सना मिळण्यास मदत होईल. प्रामुख्याने ही सुविधा मॉल्स, विमानतळ आणि प्रेक्षणीय स्थळांवर उपलब्ध असेल.