या शनिमंदिरात भ्रष्टाचार्‍याना प्रवेश नाही


भ्रष्टाचार कमी करण्यासाठी देशोदेशीची सरकारे अनेक उपाययोजना करत असतात त्याचबरोबर नागरिकही वैयक्तीक पातळीवर त्यासाठी हातभार लावत असतात. कानपूर मधील रोबी शर्मा या माणसानेही भ्रष्टाचारावर लगाम घालण्यासाठी एका वेगळ्याच मंदिराची स्थापना केली आहे. शनिदेवाच्या या मंदिरात इतरही देवतांच्या मूर्ती आहेत व या मंदिराचे नामकरण भ्रष्ट तंत्र विनाशक शनिमंदिर असे केले गेले आहे. कानपूर विद्यापीठाच्या मागे हे मंदिर आहे.

या मंदिरातील मूर्ती स्थापन करताना कांही तर्क लढविले गेले आहेत. म्हणजे शनीच्या मूर्तींसमोर ब्रह्माची मूर्ती असून ही मूर्ती शनिमूर्तींकडे पाहते आहे. तशीच शनीकडे पाहणारी हनुमानाची मूर्तीही आहे. मंदिरात अधिकारी, मंत्री, नेते, उच्च न्यायाधीश यांचे फोटो लावले गेले आहेत व शनी देवाची नजर या फोटोंवर पडेल अशा जागी हे फोटो आहेत. या मागे संबंधित अधिकार्‍यांनी त्यांचे काम चोखपणे व प्रामाणिकपणे करावे अन्यथा शनीदेवाच्या कोपाला सामोरे जावे अशी भावना आहे. या मंदिरात सर्वसामान्य कुणीही जाऊ शकतो मात्र भ्रष्टाचार करणारे कुणीही मग ते शिपाई असोत अथवा मंत्री असोत त्यांना मात्र प्रवेश नाही अशी सूचनाही आहे.

अर्थात पूर्वी भ्रष्टाचार करत होते मात्र आता करत नाहीत अशांना मंदिर प्रवेश करता येतो. येथे मूतीला तेल घालणे, प्रसाद दाखविणे, घंटा वाजविणे असले प्रकार करता येत नाहीत मात्र लवंग, वेलदोडा, काळीमिरी, मातीच्या पणत्या लावता येतात. भ्रष्टाचार्‍याबरोबरच या मंदिरात दारू पिणारे, कुठेही थुंकणारे, तंबाखू खाणारे यांनाही प्रवेश नाही.

Leave a Comment