तामिळनाडूचे बदलते राजकारण


तामिळनाडूच्या राजकारणाची ढब आपल्या सर्वांना माहीत आहे. तिचा विचार करणारांना एक प्रश्‍न पडला होता की, अजून जयललिता यांचा खरा वारस कोण या मुद्यावरून वाद कसा निर्माण झाला नाही ? शेवटी काल अशा सर्वांची उत्सुकता पूर्ण करीत जयललिताच्या भाचीने राजकारणाच्या रंगमंचावर प्रवेश केला. जयललिता यांचा भाऊ जयकुमार जयरामन याची ही कन्या. तिने जयललिताच्या आजारपणात आणि मृत्यूनंतर आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला पण जयललिताची सख्खी मैत्रिण शशिकला नटराजन हिने जयललिताच्या घरच्या कारभारात असा काही जम बसविला होता की तिने या भाचीला जयललिताच्या जवळपासही फिरकू दिले नाही. आपल्या आत्याच्या शेवटच्या काही दिवसांत ती दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न करायला लागली तेव्हा शशिकलाने तिला पोलिसांकडून हाकलून लावले. तेव्हा आपल्या आत्याच्या हयातीत पुढे न आलेली ही भाची काल तिच्या निधनानंतर प्रकट झाली आणि तिने तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदावर आपला दावा सांगितला.

आपल्या देशातले भोळे भाबडे मतदार फारच भावनिक होतात. जयललितांच्या मृत्यूने तिथले त्यांचे भक्त किती हळहळायला लागले आहेत हे आपण पाहिलेच आहे. तेव्हा असे लोक राजकीय नेत्यांचे वारस नक्की करताना ते कसे दिसतात याला फार महत्त्व देतात. आता उत्तर प्रदेशात राहुल गांधी यांच्या ऐवजी प्रियंका गांधी यांनी राजकारणात उतरावे असा लोकांचा आग्रह सुरू आहे. त्यामागे प्रियंका गांधी या फार हुशार आहेत असे काही कारण नाही. प्रियंका गांधी यांचे व्यक्तिमत्त्व इदिरा गांंधी यांच्यासारखेच आहे. त्यांचे नाक तर थेट आपल्या आजीसारखे आहे. त्याचा प्रभाव मतदारांवर पडेल असे अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांना वाटते. तामिळनाडूत आता अशीच चर्चा सुरू आहे. जयललिता यांनी आपल्या हयातीत शशिकला या आपल्या म्रैत्रीणीला आपल्या अंतरंग सखीचा दर्जा दिला होता. त्या नात्याचा गैरफायदा घेऊन शशिकला यांनी आता अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीसपदाचा स्वीकार केला आहे. त्यांना कारभाराचा अनुभव नसल्याने त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलेले नाही. ओ पेनिरसेल्वम यांना हे पद मिळाले आहे कारण ते बर्‍याच वर्षांपासून मंत्री आहेत आणि जयललिता यांना ज्या ज्या वेळी काही कारणांनी मुख्यमंत्री पद सोडावे लागले तेव्हा तेव्हा त्यांनी पेनिरसेल्वम यांनाच हंगामी मुख्यमंत्री केले होते. जयललिता यांना आपला वारस म्हणून कोण हवे होते हे त्यांनी त्यातून पुरतेपणाने स्पष्ट केले होते. त्यामुळे शशिकला यांना या पदावर हक्क सांगितला नाही. पण त्यांनी सरचिटणीसपद मात्र स्वीकारले.

लोकांना शशिकला या जयललिताच्या वारस म्हणून पसंत नाहीत. ते दिसलेही आहे. शशिकला यांनी पक्षातले हे पद स्वीकारल्यानंतर आपल्या नावाची द्वाही फिरवण्यासाठी तामिळनाडूतले सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे पोस्टर्सचा वापर केला. सार्‍या राज्यांत आपल्या नावाची भित्तीपत्रके लावली. त्यात आपली पूर्ण झबी झळकवली तर बाजूला जयललिताचा फोटो लावला. अनेक ठिकाणी लोकांनी ही भित्रीपत्रके फाडली. त्यावरच्या शशिकलाच्या फोटोवर शेण थोपले. शशिकला ही जयललिताची मैत्रिण असली तरी तिच्यामुळेच जयललिता यांना कारागृहात जावे लागले याचा लोकांना राग आहे. त्यातून असे प्रकार घडले आहेत. लोकांचा हा राग पाहून आणि जनता शशिकला यांना मानत नाही हे बघून आता दीपा जयरामन हिने उचल खाल्ली आहे. जयललिताच्या हयातीत पत्ता नसलेल्या या भाचीचे खरे नाव दीपा माधवन असे आहे पण आता आपल्या आत्याच्या वारशावर दावा लावायचा असल्याने तिने आपल्या नावात बदल केला आहे आणि ते आत्याच्या आडनावासह दीपा जयरामन असे केले आहे.

ती जयललिता यांच्यासारखी दिसते पण ती आत्या मरण पावल्यानंतर उगवली आणि सुरूवातीचे काही दिवस ती पत्रकार पारिषदा घेऊन आपल्या आत्याच्या निधनाबद्दल खुलासे विचारणारे प्रश्‍न विचारीत असे. मात्र शशिकला या लोकांना स्वीकारार्ह नाहीत हे कळल्यापासून दीपाने आता भीड मोडून थेट मुख्यमंत्रीपदाचीच मागणी केली आहे. तामिळनाडूतल्या जाणकार नेत्यांच्या मते दीपा जयरामनच्या या युक्त्यांचा काही फायदा होणार नाही कारण ती राजकारणात कोठेच नसते. ओ पेनीरसेल्वम जम बसवायला लागले आहेत. त्यांना त्यात यश आल्यास तामिळनाडूतल्या राजकारणाचा व्यक्तिकेन्द्रित बाज बदलणार आहे. चित्रपटातली लोकप्रियता राजकारणात वापरून सत्ता काबुज करण्याचा जमाना संपत आहे. ही परंपरा केवळ अण्णा द्रमुक मध्येच आहे असे नाही. करूणानिधी यांच्या द्रमुक पक्षातही हेच जारी आहे. या पक्षात घराणेशाही आहे. ती जोरदार असण्याचे कारण म्हणजे त्यांच्या तीन पत्न्यांची मुले आणि मुलीही वारसा युद्धात उतरलेली असतात. असें असले तरी एम. के. स्टॅलिन याने करुणानिधीचा वारस म्हणून आपले स्थान पक्षात भक्कम केेले आहे. ही घराणेशाही अजागळपणाची आहे पण निदान लोकशाहीला दिलासा एवढा आहे की, स्टॅलिनचे नेतृत्व हे चित्रपटातल्या लोकप्रियतेवर अवलंंबून नाही. तरीही पेनिरसेल्वम यांच्या रूपाने तामिळनाडूत सामान्य माणसाचे राजकारण बळकट होणार आहे.

Leave a Comment