भारत गाठणार ७. ७ विकासदर
संयुक्त राष्ट्रांचा अंदाज; आशिया ठरेल सर्वाधिक विकासदर साधणारा खंड
नवी दिल्ली: भारत आर्थिक क्षेत्रातील आपली घोडदौड सुरूच ठेवेल आणि सन २०१७ मध्ये ७. ७ टक्के विकासदर गाठू शकेल; असा अंदाज संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. आशिया खंडही विकासाचा मोठा टप्पा गाठण्यात अग्रेसर राहील; असा अंदाज अहवालात वर्तविण्यात आला आहे.
भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. मागील वर्षात देशाचा विकासदर ७. ६ टक्के होता. या वर्षात त्यात ७. ७ टक्क्यांपर्यंत वाढ होईल; अशी शक्यता संयुक्त राष्ट्र संघांनी वर्तविली आहे. सन २०१८ त्यामध्ये किंचित घट होऊन तो पुन्हा ७. ६ वर येईल; असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
विदेशी गुंतवणुकीची सुलभ प्रक्रीया, मूलभूत सुविधांमध्ये वाढलेली गुंतवणूक, ‘पब्लिक – प्रायव्हेट पार्टनरशिप’ अंतर्गत होणारी गुंतवणूक यामुळे भारताचा विकासदर चढा राहण्यास मदत होईल; असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. जागतिक पातळीवर विकासदर सन २०१७ मध्ये २. ७ असेल आणि सन २०१८ मध्ये तो २. ९ असेल; असा अंदाजही या अहवालात वर्तविण्यात आला आहे.