पूर्वी राजकारण करणारांना ते कसे करावे याचे ज्ञान असायचे कारण ते लोक समाजाची सेवा करीत करीत राजकारणात आलेले असत. समाज कसा आहे. लोक कसा विचार करतात आणि लोकांच्या भावना कशा आहेत याचा अनुभव त्यांनी घेतलेला असायचा. त्यावरून त्यांना कोणाची मते कशी मिळवावीत याचे ज्ञान झालेले असायचे. पण १९८४ साली राजकीय पक्षाच्या धोरणांना नवे वळण लागले. राजीव गांधी यांनी आपल्या निवडणूक प्रचारासाठी एका जनसंपर्क कंपनीला कंत्राट देऊन बांधून घेतले. या कंपनीने राजीव गांधी यांचा वेष कसा असावा यापासून ते त्यांनी कोणत्या शैलीत बोलावे इथपर्यंत सारे नियोजन केले. त्यामुळे राजीव गांधी यांना मोठा विजय मिळाला. या प्रकारापासून धडा घेऊन सारेच राजकीय पक्ष आता अशा कंपन्यांना कंत्राटे द्यायला लागल्या आहेत.
धंदेवाईक सल्लागार
या क्षेत्रात प्रशांत किशोर हे नाव फार चर्चिले जात आहे कारण ते नरेन्द्र मोदी यांचे प्रचार प्रमुख होते. प्रचार कसा करावा, लोकांपर्यंत कसे पोचावे आणि एकुणात निवडून कसे यावे याचे ते नियोजन करीत असत आणि मोंदी निवडून येत असत. अर्थात त्यांची ही सेवा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेपुरतीच मर्यादित होती. अशा मोहिमा राबवणारांना आपण कोणत्या विचाराच्या पक्षाला आपली सेवा देत आहोत याचा विचार करण्याची काही गरज वाटत नाही. जो सेवा मागेल त्याला ती देणे हाच आपला धंदा असा त्यांचा खाक्या आहे. त्यामुळे त्यांनी गेल्या निवडणुकीत नितीशकुमार यांना आपली सेवा बहाल केली तर आता ते उत्तर प्रदेशात कॉंग्रेसच्या निवडणूक प्रचार मोहिमेचे कंत्राट घेऊन कामाला लागले आहेत.
त्यांचे अनुकरण करून अनेक गावांतही आता अनेक लहान सहान कंपन्या स्थानिक पातळीवर हाच धंदा करायला लागल्या आहेत. पण आता या कंपन्या एक पाऊल पुढे टाकून आपला सल्ला घेणार्या राजकीय पक्षाला धोरणात्मक सल्लाही द्यायला लागल्या आहेत. त्यांच्यापुढे राजकीय पक्षांनी आपले राजकीय धोरण ठरवण्याचेही स्वातंत्र्य बहाल केले आहे. सध्याचे राजकीय नेते कसल्याही सामाजिक कामातून पुढे आलेले नाहीत. आपल्या बापाचा पैसा वापरून डिजिटल फलक उभे करून नेता व्हायचे आणि त्यांच्याच पैशातून राजकारणात हात मारायचे असा नव्या पिढीतल्या नेत्यांचा प्रघात आहे. त्यांना ना समाजकारण समजत नाही राजकारण. त्यामुळे ते राजकीय ज्ञानासह सारे काही पैसे देऊन खरेदी करायला लागले आहेत आणि त्यामुळे उत्तर प्रदेशात अशा धंदेवाईक लोकांचा सुळसुळाट झाला आहे.