चीनच्या बंदिस्त बाजारामुळे अमेरिकन गुंतवणूकदार निराश
चीनमधील अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या अहवालातील स्पष्टोक्ती
बीजिंग: चीनच्या बाजारपेठेत विदेशी उत्पादकांना होणारा अटकाव आणि चीनमधील अर्थव्यवस्थेला आलेले सुस्तावलेपण यामुळे विदेशी गुंतवणूकदार चीनमध्ये गुंतवणूक करण्याबाबत निराशावादी असल्याचा निष्कर्ष चीनमधील अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वार्षिक अहवालात काढण्यात आला आहे. चीनची बाजारपेठ विदेशी उत्पादनांसाठी खुली होण्याची शक्यता धूसरच असल्याने विदेशी गुंतवणूकदारांसाठी चीन हे गुंतवणुकीसाठी आकर्षणाचे ठिकाण उरलेले नाही; असे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी नुकतेच ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये भाषण केले आहे. या भाषणात त्यांनी चीनमध्ये बाजारपेठ खुली करण्याचे आणि विदेशी गुंतवणुकीवरील बंधने शिथिल करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी आलेल्या अहवालात चीनमध्ये विदेशी गुंतवणुकीसाठी निराशेचा सूर आळविण्यात आला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर अमेरिका आणि चीन यांचे आर्थिक संबध कसे असतील; याचीही गुंतवणूकदारांच्या समूहाला उत्सुकता आहे. चीनी उत्पादने बाजारपेठेत विपरीत व्यवहार करीत असून त्यांच्यावर कर लादला जाईल; असा इशारा ट्रम्प यांनी यापूर्वीच दिला आहे. अनेक अमेरिकन कंपन्यांनी चीनमधील गुंतवणूक आवरती घेतली आहे. चीनच्या अर्थविकासाची धीमी गती, बाजारपेठेत उत्पादने आणण्यात येणारे अडसर, वाढता उत्पादन खर्च आणि जाचक नियम यामुळे चीन गुंतवणूकदारांसाठी आकर्षण राहिलेले नाही; असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.