सर्व व्यवहारांसाठी आधार कार्ड ठरणार युनिव्हर्सल आयडी


नवी दिल्ली – आता सर्व व्यवहारांसाठी तुमचे आधार कार्ड युनिव्हर्सल आयडी ठरणार असून १२ अंकी आधार कार्ड क्रमांक भीम अॅपमध्ये टाकून व्यवहार करण्याची सुविधा आधार कार्ड धारकांना मिळणार असल्यामुळे भविष्यात ऑनलाइन व्यवहारांसाठी एटीएम कार्डांची गरज भासणार नाही.

भीम अॅपमध्ये आधार कार्डचा पेमेंट आयडी म्हणून समावेश करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. भीम अॅपमध्ये ही सुविधा येत्या काही आठवड्यांमध्ये उपलब्ध होणार आहे. आधार कार्ड पेमेंट आयडी झाल्यास अॅपमध्ये बायोमेट्रीक नोंदणी आणि बँकेच्या यूपीआय रजिस्ट्रेशनही करावे लागणार नाही. आधार कार्ड क्रमांक टाकून व्यवहार करता यावे यासाठी यूआयडीएआय बँक आणि अन्य यंत्रणांशी चर्चा करत असून येत्या काही आठवड्यात ही सुविधा कार्यान्वित होईल असा दावा केला जात आहे.

इकॉनॉमिक टाइम्सला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयभूषण पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील ३८ कोटी जनतेचे आधार कार्ड क्रमांक त्यांच्या बँकेशी जोडलेले आहेत. त्यामुळे या द्वारे व्यवहार करणे सहज शक्य होऊ शकते. भीम अॅपवरून व्यवहार करण्यासाठी पैसे पाठविणारा आणि स्वीकारणारा या दोघांचेही ‘यूपीआय’सक्षम बँकेत खाते हवे असते. यूपीआय पिन मिळवण्यासाठी डेबिट कार्डाचा तपशील द्यावा लागतो आणि त्यामुळे गोरगरीब आणि अशिक्षित मंडळी वेळखाऊ प्रक्रियेमुळे या अॅपकडे पाठ फिरवतील अशी शक्यता वर्तवली जात होती.

कामगारापासून कोणाच्याही बँक खात्यात ‘आधार’मुळे पैसे जमा करणे शक्य होणार आहे. यासाठी त्या व्यक्तीकडे भीम अॅप नसले तरी चालेल, फक्त त्याचे बँक खाते आधार कार्डाशी संलग्न असणे गरजेचे असल्याचे पांडे यांनी म्हटले आहे. दर महिन्याला सुमारे २ कोटी लोकांचे आधार कार्ड क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी जोडत आहे. आगामी तीन महिन्यांमध्ये देशातील निम्या लोकांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment