नवीन वर्षासाठी चीन सजले


चीनचे नवे लूनर वर्ष येत्या २८ जानेवारीपासून सुरू होत असून यंदाचे वर्ष हे रूस्टर म्हणजे कोंबडा वर्ष आहे. चीनमध्ये वर्षांची नावे प्राण्यांपासून दिली जातात. त्यानुसार यंदाचे वर्ष रूस्टर आहे. दरवर्षी चीनी नव वर्ष वेगळ्या तारखेला सुरू होते. म्हणजे २१ जानेवारी ते २० फेब्रुवारी या दरम्यान ते सुरू होते. नव वर्षानिमित्त चीनमध्ये १५ दिवस उत्सव सुरू असतात.


आपल्या दिवाळीप्रमाणेच या सणानिमित्त घरे स्वच्छ केली जातात व शहरे गांवे लाल रंगाच्या सजावटीने सजविली जातात. जुने सामान नष्ट केले जाते व रस्त्यारस्त्यातून लाल रंगाचे कंदिल टांगले जातात. वसंतोत्सवाबरोबर हा सोहळा संपतो. रोस्टर वर्ष असल्याने यंदा कोंबड्यांच्या आकाराची खेळणी खरेदी केली जातील. येथेही नववर्षासाठी विविध प्रकारचे पारंपारिक पदार्थ केले जातात. काही धार्मिक कृत्येही परंपरेनुसार पार पाडली जातात. एकमेकांना शुभेच्छा देणे, भेटी देणे, मेजवान्या देणे याची एकच धांदल असते. मोठ्या संख्येने पर्यटकही नवीन वर्ष सोहळा पाहण्यासाठी चीनला भेट देतात.

नव वर्षात चाकू सुर्‍या यासारखी धारदार वस्तू, चार च्या संख्येतील वस्तू, चपला, बूट, रूमाल, घड्याळे, आरसे यासारख्या भेटी देणे अशूभ मानले जाते. त्याऐवजी फळे, आठच्या संख्येने वस्तू, लाल रूमालात बांधलेले पैसे देणे शुभ समजले जाते.