जवानांच्या तक्रारीसाठी केंद्राचे मोबाईल अ‍ॅप


नवी दिल्ली – सोशल मीडियावर जवानांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केंद्र सरकारकडून सीएपीएफ जवानांच्या तक्रारीसाठी एक मोबाईल अ‍ॅप तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे. तर दुसरीकडे सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) ड्युटीवर असताना मोबाईलच्या वापरावर बंदी घातली आहे. बीएसएफने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, फील्डवर उपस्थित असलेल्या सर्व कंपनीच्या कमांडरनी दक्षता घ्यावी की, त्यांच्या कोणताही जवान ड्युटीवर मोबाईल घेऊ येणार नाही.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह सचिव राजीव महर्षी सीएपीएफ जवानांसाठी अ‍ॅप तयार करण्याचा सल्ला घेत आहेत. तसेच नॅशनल इंफॉमेटिक्स सेंटरकडून (एनआयसी) हे अ‍ॅप विकसीत करण्यात येणार असून ते लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मंत्रालयातील अधिकार्‍याने सांगितले की, जर जवानांना ड्यूटीवर मोबाईल नेण्यास बंदी करण्यात आली असेल, तर ते ड्युटी संपल्यानंतर या अ‍ॅपवर आपली तक्रार पाठवू शकतात.

हे अ‍ॅप तयार करताना त्यातील गोपनियता ठेवण्यासाठी त्यात सिक्युरिटी फीचर्स असणार आहेत. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हे अ‍ॅप विकसीत करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. याशिवाय सर्व जवानांच्या मोबाईल क्रमांकाची माहिती जमा करण्याचे आदेश दिले आहेत. या अ‍ॅपमध्ये एक फिल्टर असणार आहे. ज्यामुळे मंत्रालयातून पुष्टी मिळाल्यानंतर तक्रार थेट संबंधीत अधिकार्‍याकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती एका अधिकार्‍याने दिली.

Leave a Comment