मुंबई – प्रत्येक स्वयंपाकघरात वर्षोनवर्षे लाल मिरची पावडरपासून ते सांबार मसाल्यापर्यंत हक्काने विराजमान झालेले एमडीएच मसाले आपल्या सर्वांच्याच परियचाचे आहे. त्याच मसाल्याच्या पॅकेटवर सुहास्य वदनाने झळकणारे, पिळदार मिशीवाले आजोबा अर्थात धरमपाल गुलाटी हे देशातील ‘सर्वात श्रीमंत कार्यकारी अधिकारी (सीईओ)’ बनले आहेत. ९४ वर्षांच्या या आजोबांनी या शर्यतीमध्ये गोदरेज कन्झ्युमरचे आदि गोदरेज आणि विवेक गंभीर, हिंदुस्थान युनिलिव्हरचे संजीव मेहता तसेच आयटीसीचे वाय. सी. देवेश्वर यांना मागे टाकत प्रथम क्रमांत पटकावला आहे. महाशियां दी हट्टी ही कंपनी एमडीएच नावाने प्रसिद्ध आहे.
एमडीएचचे आजोबा ठरले सर्वात श्रीमंत सीईओ
धरमपाल गुलाटी हे महाशयजी या नावानेही ओळखले जातात. ते वयाच्या ९४व्या वर्षीही नेमाने, न चुकता दररोज कारखान्यात जातात आणि डीलर्सनाही भेटतात. एमडीएच कंपनीच्या समभागांपैकी ८० टक्के समभाग त्यांच्याकडे असून गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने २१३ कोटींचा नफा कमावला ज्यापैकी २१ कोटी रुपये सीईओ गुलाटी यांच्या खात्यात जमा झाले. गुलाटी यांचे वडील चुन्नीलाल यांनी १९१९ साली पाकिस्तानातील सियालकोटमध्ये एक छोटस दुकान सुरू केले. मात्र त्याच दुकानाचे रुपांतर एवढ्या मोठ्या कंपनीत होईल, असा विचार त्यांनी स्वप्नातही केला नव्हता. मात्र ६ दशके अथक मेहनत करून धरमपाल गुलाटी यांनी ही कंपनी आज या पदावर पोहोचवली आणि मसाल्यांच्या जगात एक नव स्थान मिळवले.