लढाई … कुणाच्या अस्तित्वाची ,कुणाच्या वर्चस्वाची !


आता महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. काल -परवा परवापर्यंत चाचपणी करणारे इच्छुक आता कामाला जुंपले आहेत, हे दरवेळी असणारे नेहमीचे चित्र तसे फारसे महत्वाचे नाही. मोदी लाट अजूनही असल्याने शत प्रतिशत कोण ? ही उत्सुकता जशी महत्वाची आहे त्याहीपेक्षा आता कुणाला अस्तित्वासाठी निकराची झुंज द्यावी लागणार हा मुद्दा राजकीय वर्तुळात महत्वाचा ठरला आहे.
‘बेरजेचे राजकारण ‘करून ‘भाईं’चे साम्राज्य ज्यांनी संपविले ते ‘कारभारी’ हद्दपार करण्यासाठी भाजपेयींनी ‘शत प्रतिशत’साठी कंबर कसली आहे परिणामी आता कुणाची वर्चस्वासाठी लढाई आहे यापेक्षा अस्तित्वासाठी लढत देताना शह -काटशहाचे राजकारण विसरून कोण -कोण एकीची मोट बांधणार हेच पुण्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचे ठरले आहे

पुण्याच्या राजकारणावर काँग्रेसचे पर्यायाने माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे असलेले वर्चस्व ‘खड्ड्यां’चे राजकारण करून राष्ट्रवादीने विशेषतः अजितदादा पवार यांनी जसे संपविले,त्याच धाटणीचा डाव आता भाजपने मोदी लाटेच्या जोरावर खेळला आहे. पिंपरी-चिंचवडवर एकेकाळी प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या नेतृत्वाखाली असलेली काँग्रेसची सत्ता त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीने काँग्रेसला नमवून हस्तगत केली आणि ‘दादां’च्या अधिपत्याखाली एकहाती सत्ता आणली; पण आता विकासाच्याबाबतीत अग्रेसर असणाऱ्या पिंपरी -चिंचवडवर ‘दादां’च्या असलेल्या एकहाती सत्तेला सुरुंग लावण्याचे कारस्थान सुरु झाले आहे. पुण्यात कारभारी बदला … भाकरी फिरवा हा साहेबांनी दिलेला मंत्र काँग्रेसच्या सत्तेला मारक ठरला आणि भाईंचे वर्चस्व संपुष्टात आले आणि काँग्रेसही नामोहरम झाली, ती अजूनही सावरलेली नाही.सामूहिक नेतृत्वाचा प्रयोग कधीच सफल होणार नाही अशीच चिन्हे आहेत. गटा -तटाच्या राजकारणात गुरफटलेल्या शहर काँग्रेसला सावरण्यासाठी कुणीच ‘कासावीस’ होत नसल्याने अनेक जण राष्ट्रवादीसह अन्य पक्षात दाखल झाले आणि होत आहेत. निष्ठावंत काँग्रेसमध्येच राहिले असले तरी ‘आता पुरे’ या मानसिकतेत ते आहेत.

भाजप -सेनेला सोबत घेऊन ‘पुणे पॅटर्न’चा नवा कारभार अजितदादांनी आणला खरा ;पण भाजप-सेनेच्या कुबड्या घेऊन सत्तेचा पट मांडताना सत्तेत सहभागी असलेल्या भाजपला विरोधी पक्षनेतेपद देऊन विरोधी पक्ष नामधारी करण्याचा प्रयोगही साध्य केला.नंतर विधानसभा निवडणुकीवेळी युतीशी काडीमोड घेत राष्ट्रवादीने काँग्रेसशी पुन्हा घरोबा केला; मात्र ते करताना पालिकेच्या सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसकडे विरोधीपक्षनेतेपद आले. त्यामुळे ‘सांगता येत नाही आणि सहनही होत नाही ‘ अशा अवस्थेतून युतीला सत्ता भोगायला मिळाली; पण गत महापालिका निवडणुकीत बीआरटी असो अन्य मुद्द्यांवर एक अवाक्षरही न काढता युती निवडणुकीला सामोरी गेली. कारण पुणे पॅटर्नच्या सत्तेत सामील असल्याने युतीचीच कोंडी झाली. नेमके हेच शल्य युतीला आहे;पण बोलायचे कसे ? हा तिढा अजूनही आहे, जी विकासकामे झाली आहेत,त्या-त्या निर्णय प्रक्रियेत युतीही सामील होती. परिणामी सोयीनुसार अलिप्त राहूनही विकासाचे श्रेय राष्ट्रवादीच्या पदरात पडत असले तरी शहराचा चेहरा -मोहरा हा पुण्यातील राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने बदलला आणि पायाभूत सुविधांसाठी पुण्याला कोट्यवधींचा निधी हा केंद्राकडून मिळाल्याची वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही आणि तो निधी तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांच्या प्रयत्नातून मिळाला ही बाबही दुर्लक्षून चालणार नाही.एकीकडे काँग्रेसला हद्दपार करण्यासाठी सेना -भाजप युतीशी सलगी करणारी राष्ट्रवादी शहराच्या राजकारणात तर अव्वल ठरली शिवाय विकासाचे श्रेय फक्त आणि फक्त स्वतःला मिळवण्यासाठी युतीला गारद करण्यातही यशस्वी ठरली.

गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे केंद्रच काय राज्यात चित्रच बदलले. मोदी लाटेमुळे अन्य पक्षांचे ‘होत्याचे नव्हते झाले’ अशी म्हणायची वेळही ओढवली. आता महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना आपले वर्चस्व अबाधित राहील की नाही यापेक्षा आपले अस्तित्व टिकेल कि नाही याची धास्ती व्यक्तिगत असो , पक्षीय पातळीवर सर्वांना आहे. त्यातही सर्वत्र वातावरण मोदीमय झाल्याने अनेकांनी आधीच्या पक्षाला सोडून भाजपशी घरोबा केला आहे. असे असले तरी केंद्रात काय राज्यात सत्ता येताच भाजपने महापालिका निवडणुकांची तयारी चालवली होती.त्यातूनच महापौर भाजपचाच हा प्रचारही सुरु केला होता . या पार्श्वभूमीवर महापालिकेवर झेंडा कुणाचा फडकणार याचीच उत्सुकता सर्वांना असली तरी ‘एका दगडा’तच्या धर्तीवर भाजपचे डावपेच राष्ट्रवादी असो किंवा अन्य पक्षांना महागात पडणार याचे संकेत आतापासून मिळत आहे. पण मुख्य प्रश्न असा , मतांची टक्केवारी वाढवून भाजप राष्ट्रवादीला सत्तेतून पायउतार करणार की ‘पुणे पॅटर्न’ च्या धर्तीवर नवा प्रयोग करून सत्तेत सामावून घेऊन ‘जशास तसे’चा पट मांडणार हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईलच ;पण पिंपरी -चिंचवडमध्ये जे सध्या घडतेय ते पाहता, ज्या पद्धतीने राष्ट्रवादीने पिंपरी – चिंचवडपाठोपाठ पुण्यावर कब्जा मिळवला त्याच दिशेने भाजपची आगेकूच सुरु आहे त्यामुळे ‘भाईं’चा कारभार संपुष्टात आणणाऱ्या ‘दादां’नंतर ‘भाऊ ‘ की अन्य कोण ? हाच खरा प्रश्न आहे.

Leave a Comment