पेट्रोल, डिझेलचा पुन्हा भडका; १० महिन्यात १४ रुपयांनी महागले पेट्रोल


नवी दिल्ली – मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात प्रती लीटर 42 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रती लीटर 1.03 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हे नवीन दर आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत. मागील दहा महिन्यांमध्ये पेट्रोलच्या दरात तब्बल चौदा रुपयांनी महागले आहे.

सहा आठवड्यामधील ही पेट्रोलची सलग चौथी, तर डिझेलची तिसर्‍यांदा दरवाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी जाहीर केले आहे की, या दरवाढीमध्ये राज्य सरकारकडून लागू करण्यात येणार्‍या कराचा समावेश नसल्याने प्रत्यक्षात यापेक्षा अधिक दरवाढ होणार आहे. दिल्लीत पेट्रोलच्या किमतीत 53 पैसे, तर डिझलच्या किमतीत 1.20 पैसे वाढ होणार आहे.

दरम्यान, मागील वर्षी मार्च महिन्यात पेट्रोलचे दर सर्वात कमी होते. दिल्लीत सध्या 71.14 रुपये आणि मार्च-2016मध्ये 56.61 रुपये दर होता, तर डिझेलचा सध्याचा प्रति लिटर 59.02 एवढा दर असून जानेवारी-2016मध्ये 44.18 पैसे एवढा सर्वात कमी दर होता.

हेच का अच्छे दिन?
वाढत्या पेट्रोल दराबाबत भाजपला सवाल करत काँग्रेस नेता रणदीप सिंह सुरजेवाला म्हणाले, हेच का तुमचे अच्छे दिन. सुरजेवालाने ट्विट केले की, कच्च्या तेलाच्या किंमती $.46 प्रति बॅरल कमी झाले आहेत. मात्र मोदी सरकारने तेलाच्या किंमतीत वाढ केली आहे. 30 दिवसांमध्ये पेट्रोल/डिझेलचे दर 4.92/4.25 रुपयांनी वाढविले आहेत. हेच का तुमचे अच्छे दिन?

Leave a Comment