जगभरातील फक्त ८ जणांकडे जगातील अर्धी संपत्ती


लंडन – जगातील केवळ आठ जणांकडे सुमारे निम्म्या लोकसंख्येकडे असलेल्या संपत्ती इतकीच संपत्ती तर एकट्या भारतात १ टक्के अब्जाधीशांकडे देशातील ५८ टक्के संपत्ती एकवटली असल्याचे ऑक्‍सफॅम या जगप्रसिद्ध संस्थेच्या पाहणीमध्ये स्पष्ट झाले असून हा अहवाल जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण राजकीय नेते व उद्योगपती यांच्या स्वित्झर्लंडमधील दावोस शहरामधील परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर प्रकाशित झाला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत जगातील अतिश्रीमंत व गरीब यांच्यामधील आर्थिक दरी ही अधिक रुंदावली असल्याचे निरीक्षण ऑक्‍सफॅमने नोंदविले आहे. याचबरोबर, या समस्येवर केवळ भाषणे ठोकण्यापेक्षा खरी उपाययोजना करण्यात यावी, असे आवाहनही संस्थेकडून करण्यात आले आहे. या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यात न आल्यास अशा स्वरुपाच्या असमानतेच्या विरोधातील जनतेमध्ये असलेला संताप वाढून त्यामुळे मोठे राजकीय बदल घडण्याचा इशाराही संस्थेकडून देण्यात आला आहे.

जगामधील प्रत्येक १० पैकी १ नागरिक दिवसाला दोन डॉलर्सपेक्षाही कमी उत्पन्नावर जगत असताना एवढ्या कमी जणांच्या हातामध्ये ऐवढी अमाप संपत्ती एकवटली जाणे हे योग्य नाही. कोट्यवधी नागरिक असमानतेमुळे गरिबीच्या आवर्तामध्ये ढकलले जात आहेत. यामुळे आपले समाज व लोकशाहीपुढे धोकादायक आव्हाने उभी राहत आहेत, असे विनी ब्यानयिमा या ऑक्‍सफॅमच्या कार्यकारी अध्यक्षांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या अभ्यास अहवालामध्ये निवडक ६२ जणांकडे जगातील निम्म्या लोकसंख्येइतकी संपत्ती एकवटली असल्याचे निरीक्षण मांडण्यात आले होते. या अभ्यासासाठी ऑक्‍सफॅमने फोर्ब्सच्या माहितीचाही वापर केला आहे.

दरम्यान वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीआधी ऑक्सफॅमने प्रसिद्ध केलेल्या या अहवालात नमूद केले आहे की, भारतामध्ये ५७ अब्जाधीशांच्या हातात २१६ अब्ज डॉलर एवढी संपत्ती असून ही ७० टक्के लोकसंख्येच्या संपत्तीएवढी आहे. या यादीत मुकेश अंबानी (९.३ अब्ज डॉलर्स), दिलीप संघवी (१६.७ अब्ज डॉलर्स) आणि अझीम प्रेमजी ९१५ अब्ज डॉलर्स) हे भारतातील अब्जाधीशांमध्ये आघाडीवर आहेत. भारतामधली एकूण संपत्ती ३.१ लाख कोटी डॉलर्स असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर एकूण जागतिक संपत्ती २५५.७ लाख कोटी डॉलर्स असल्याचे म्हटले आहे. यामध्ये बिल गेट्स (७५ अब्ज डॉलर्स), अमान्सिओ ओर्तेगा (६७ अब्ज डॉलर्स) व वॉरेन बफे (६०.८ अब्ज डॉलर्स) यांचा समावेश आहे.

Leave a Comment