गांधी आणि मोदी


पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे छायाचित्र खादी ग्रामोद्योगाच्या डायरीवर छापण्यात आले आहे. त्या डायरीवर महात्मा गांधी यांचे छायाचित्र छापण्याचा प्रघात होता. कारण खादी ग्रामोद्योग ही महात्मा गांधी यांची संकल्पना होती. गांधीजींनी १९१६ साल पासून अडीच वर्षे भारत देश समग्रपणे पाहिला तेव्हा त्यांना असे आढळले की भारत हा गावांत म्हणजे खेड्यांत राहणारा देश आहे. या देशात सात लाख खेडी आहेत. या देशाच्या समस्या म्हणजे या खेड्यांच्या समस्या आहेत. आज आपल्या देशात शेतकर्‍यांच्या समस्यांवर उदंड चर्चा सुरू आहे पण या समस्यांवर कोणाला प्रभावी उपाय सापडत नाही. कारण त्यांनी शेतकर्‍यांचे जीवन जवळून पाहिलेले नाही. महात्मा गांधी यांनी ते पाहिले होते. त्यांनी हेही पाहिले होते की भारतातला शेतकरी हा अर्धबेकार असतो. त्याला त्याच्या शेतात पूर्ण वर्षभर काम मिळत नाही. त्यामुळे तो गरीब आहे. तेव्हा त्याला वर्षभर काम मिळून त्याची गरिबी हटावी यासाठी गांधीजींनी खादी ग्रामोद्योगाची कल्पना मांडली. त्यामुळे या संस्थेच्या कॅलेंडरवर आणि डायरीव त्यांचा फोटे उचित ठरतो.

असे असले तरीही आजवर सातत्याने गांधीजीचेच छायाचित्र छापले गेलेले नाही. त्यांच्याऐवजी कोणाची छायाचित्रे छापली गेली होती याचा काही खुलासा झालेला नाही पण, यंदा नरेन्द्र मोेदी यांचा फोटो येताच गदारोळ सुरू झाला. आजवर गांधींच्या जागेवर अन्य कोणाची छायाचित्रे छापली गेली तेव्हा गदारोळ झाला नाही. पण मोदींच्याच छायाचित्राला तो व्हावा यात गदारोळ करणारांचा ढोंगीपणा आहेच पण गांधीच्या ऐवजी मोदी छापले गेल्याने हा गदारोळ होण्यामागे एक कारणही आहे. ते म्हणजे मोदी ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार मानतात त्या संघटनेने महात्मा गांधी यांना आपले नेेते कधीच मानले नव्हते. एवढेच नाही तर त्यांनी गांंधींना त्यांच्या हयातीत आणि हत्येनंतरच्या काळातही कायम थट्टेचा विषय केलेला होता. संघाने आपल्या प्रात:स्मरणात गांंधींच्या नावाचा उल्लेख केला आहे पण अशा उल्लेखाचा अर्थ त्यांचे तत्त्वज्ञान स्वीकारले असा होत नाही. कारण संघाच्या प्रात:स्मरणात परस्परांच्या विरोधात विचार मांडणार्‍या अनेक महापुरूषांचा समावेश असतो. तेव्हा प्रात:स्मरणात उल्लेख असला तरीही खाजगी बैठकीत संघाचे नेते आणि कार्यकर्ते गांधींचा उद्धार वाईट शब्दात करीत असतात. या देशाची फाळणी गांधीजींमुळे झाली, मुस्लिमांना लाडावून ठेवण्याचे पाप गांंधींचेच आणि देशाचे वाटोळे कोणामुळे झाले असेल तर ते गांधींमुळेच अशा तत्त्वज्ञानाचे बाळकडू स्वयंसेवकांना पाजले जात असते.

महात्मा गांधी हे एवढे वाईट असतानाही मोदी मात्र गांधी गांधी जप करीत आहेत. त्यामागचे कारण काय? महात्मा गांधींचा उदोउदो केला की लोकांना बरे वाटते. तेव्हा आता हाती आलेली सत्ता टिकवायची असेल तर गांधी जप केला पाहिजे असा साक्षात्कार मोदी यांना झाला असावा. खरे तर गांधी नावाची जादू भाजपाला आज कळली आहे असे नाही. भाजपाची स्थापना करताना भाजपाने गांधीवादी समाजवाद स्वीकारला होता. मात्र त्यानंतर झालेल्या निवडणुकांत फार काही हाती लागले नाही म्हणून मग पुन्हा एका कट्टर हिंदुत्ववाद स्वीकारण्यात आला. गांधीवाद आणि समाजवाद या दोघांनाही मोडीत काढण्यात आले. हिंदुत्ववादाने सत्ता मिळाली पण ती टिकली नाही. मग हिंदुत्ववाद मोडीत काढून त्याच्या जागे विकासाचा मुद्दा घेण्यात आला. त्या जोरावर सत्ता मिळाली तरी वैचारिक स्तरावर मोदी यांना गांधीवाद स्वीकारण्याची नीती अवलंबावी लागते. हा खरे तर संघाचा वैचारिक पराभव आहे. या देशात गांधीवाद मानणारे राजकीय पक्ष आहेत पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देश निर्मितीचे पूर्णपणे पर्यायी तत्त्वज्ञान बहाल करील असा दावा संघाकडून केला जात असतो पण असे पर्यायी तत्त्वज्ञान देण्याऐवजी संघाला आज गांधीजींचीच कास धरावी लागते. हा गांधी मार्गाचा विजयसुद्धा आहे.

अर्थात हा गांधी विचार स्वीकारताना गांधींच्या ऐवजी मोदीचे छायाचित्र छापणे अगदीच गैरलागू आहे. असे छायाचित्र छापण्याचा निर्णय नेमका कोणत्या पातळीवर घेतला गेला याचा काही खुलासा झालेला नाही. तशा सूचना पंतप्रधान कार्यालयाकडून गेल्या होत्या का याचा शोध घ्यावा लागेल. तशा त्या गेल्या असतील तर मोदी दोषी आहेत. त्यांचा हा आपली प्रतिमा जनमनावर ठसवण्याचा प्रयत्न निषेधार्ह आहे असे म्हणावे लागेल. अर्थात असे असले तरी या गोष्टींचा कॉंग्रेसने निषेध करावा ही गोष्ट हास्यास्पद आहे कारण कॉंग्रेसने गांधींची प्रतिमा आणि तत्त्वज्ञान मागेच गुंडाळून ठेवले आहे. शिवाय आपल्या नेत्यांच्या प्रतिमा निर्मितीत ते काही मागे नाहीत. मोदींच्या ब्रँडवर बोलताना राहुल गांधी यांनी, मुसोलिनी आणि हिटलर हेही चांगले ब्रँड होते असा टोला मारला आहे. राहुल गांधी बालीश आहेत. त्यांना आपण असा टोला मारताना तो आपल्यालाही बसू शकतो याचे भान नाही. कारण त्यांनी कितीही टोले मारले तरी लोक या दोन ब्रँडच्या जोडीने इंदिरा गांधी यांचेही नाव घेत असतात. मोदी आज महात्मा गांधींच्या जागी आपले छायाचित्र छापत आहेत पण इंदिरा गांधी यांचे चमचे, इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया म्हणत होते. ही मालिका सोनिया गांधी यांना योगिनी आणि राष्ट्रमाता म्हणण्यापर्यंत आली होती.

Leave a Comment