कॅशलेस पेमेंटसाठी छोटे डोंगल विकसित


आधार बेस्ड पेमेंट सिस्टीम म्हणजे भीम अॅपचा वापर वाढत चालला असताना केंद्र सरकारने स्मार्टफोनमध्ये सहज वापरता येईल असे छोटे डोंगल विकसित करण्याची मोठी योजना हाती घेतली आहे. या छोट्या डोंगलमुळे पीओएस मशीन्स, क्रेडीट, डेबिट कार्डच्या वापराविनाच कुणीही पेमेंट करू शकणार आहे. अशा १० लाख मायक्रो डोंगलचा वापर करता यावा यासाठी पेमेंट पॉईंट तयार केले जात आहेत.

नॅशनल पेमेंट कार्पोरेशनचे वरीष्ठ अधिकारी या संदर्भात म्हणाले, भीम अॅपमुळे पेमेंट करताना डेबिट क्रेडीट कार्डची गरज राहिलेली नाही. तसेच स्मार्टफोनची आवश्यकताही नाही. आधार नंबर व फिंगरप्रिंट च्या सहाय्याने पेमेंट शक्य होते आहे. याचा दुसरा टप्पा म्हणजे व्यापार्‍यांना पेमेंट सिस्टिमसाठी तयार केले जात आहे. त्यात मायक्रो डोंगल डेव्हलप करून ते स्मार्टफोनमध्ये वापरता येणार आहे. सध्या मोबाईल वॉलेट व पीओएस मशीनच्या सहाय्याने देवाणघेवाण करता येत असली तरी त्यासाठी दोघांकडेही फोन असणे आवश्यक आहे. तसेच पीओएस मशीनसाठी डेबिट क्रेडीट कार्ड गरजेचे आहे. नवीन सिस्टीममध्ये फोन व कार्ड दोन्हीचीही गरज नाही. पीओएस ची किंमत २५०० च्या घरात जाते. हे डोंगल त्यापेक्षाही कमी किमतीत मिळणार आहे. ते बरोबर ठेवणेही सोईचे असून ते सहज खिशातही मावू शकते.

Leave a Comment