काँग्रेस , सध्या काय करतेय !


सध्या काँग्रेसच्या मदतीने राष्ट्रवादीकडे सत्ता आहे. मात्र ‘पुणे पॅटर्न’चा कारभार त्यानंतर आघाडीचा कारभार पण एकमेकांना पाण्यात पाहण्याचे राजकारण अनेकवेळा घडले. युतीला हाताशी धरून राष्ट्रवादीने काँग्रेसवर नेहमीच शरसंधान केले.सत्तेसाठीच सर्व पक्ष झटताहेत ..सत्ता भोगत आहेत पण विकासाचा मुद्दा आला कि नामानिराळे होत आहेत. जनतेच्या हितासाठी तर विरोधी नावाचा पक्षही नाममात्र ठरण्यापर्यंत राजकारणाची मजल गेली आहे.

परिणामी पुणेकरांच्या हितासाठी आवाज उठविणारा कोणता पक्ष ? हा मुद्दाच पुण्याच्या राजकारणात निकाली निघाला आहे. त्यात एकेकाळी सत्ता भोगणारी , पालिकेवर वर्चस्व गाजविणारी काँग्रेस सध्या काय करतेय ? हा प्रश्न महत्वाचा ठरला आहे. गतवेळी फसलेल्या सामूहिक नेतृत्वाच्या प्रयोगानंतर यंदा नेतृत्वविना काँग्रेस पोरकी झाली आहे.

सद्यस्थितीत सर्वच पक्ष आगामी सत्तासमीकरणासाठी सरसावले असले तरी राष्ट्रवादी आणि भाजप वगळता अन्य पक्षांना अस्तित्वासाठी लढावे लागणार आहे. भाजप हा पक्ष सध्या तेजीत आहे; पण राष्ट्रवादीही मात्तब्बर आहे. नोटबंदीचा निर्णय कुणाला मारक ठरतो आणि कुणाला तारतो ,हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईलच मात्र काँग्रेसची रणनीती यंदाच्या निवडणुकीत काय असेल ? हा मुद्दा जसा महत्वाचा आहे त्याहीपेक्षा सत्तेच्या काळात काँग्रेसने विकासाची कामे कशी केली, शहराचा चेहरा-मोहरा कसा बदलला याची उजळणी करताना ते पुणेकरांसमोर प्रभावीपणे मांडण्याची गरज आहे; पण त्यासाठी सर्व काँग्रेसजन एकत्र येतील का ? हाच कळीचा मुद्दा आहे.शहराच्या राजकारणात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी पक्षासाठी दुसरी फळी तयार होऊच दिली नाही, हेही दुर्लक्षून चालणार नाही. त्यामुळे गत पालिका निवडणुकीत सामूहिक नेतृत्वाला न मानणारे काँग्रेसजन यंदा कुणा एकाचे नेतृत्व खुलेआम स्वीकारतील अशी काही चिन्हे नाहीत आणि सर्वमान्य सामूहिक नेतृत्व देण्याची स्थानिक नेत्यांमध्ये क्षमताही नाही.

राष्ट्रकुल स्पर्धामधील गैरव्यवहाराच्या आरोपावरून तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी हे वादग्रस्त ठरले, तुरुंगात गेले. त्यामुळे काँग्रेससमोर नेतृत्वाचाच प्रश्न निर्माण झाला. तो आजतागायत कायम आहे. सामुहिक नेतृत्वाचा निर्णय घेतला गेला पण जे नेते आहेत , त्यांना एकमुखी समर्थन मिळाले नाही. त्यामुळे गट-तट हा वाद आजही कायम आहे. कलमाडींविना काँग्रेस दिशाहीन आहे .त्यात मोदी लाटेने अनेकांना भाजपकडे आकर्षित केले आहे. इतकेच काय स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी अनेकांनी अन्य पक्षांशी यापूर्वीच घरोबा केला आहे . त्यामुळे काँग्रेस आणखीन कमकुवत झाली आहे. सत्तेच्या काळात काँग्रेस पक्षाने केलेल्या विकासकामांचाच काँग्रेसला विसर पडला आहे. आज जे-जे विकासात्मक कामे होत आहेत, त्याचे ठराव कुणी दिले होते या मुद्द्यांकडे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेते -पदाधिकारी यांच्याकडूनच दुर्लक्ष होत आहे तर ही कामे जनतेसमोर येणार कशी आणि मतदार काँग्रेसकडे वळणार कसे ? हाच खरा प्रश्न आहे.

Leave a Comment