अमेरिकेतील १४६ वर्षे जुनी सर्कस बंद होणार


“जगातील सर्वात मोठा शो” अशी ख्याती असलेली अमेरिकेतील १४६ वर्षे जुनी सर्कस बंद होणार आहे. येत्या मे महिन्यात ही सर्कस आपला शेवटचा खेळ करणार आहे, असे सर्कशीच्या मालकांनी जाहीर केले आहे. त्यामुळे ‘रिंगलिंग ब्रदर्स अँड बार्नुम अँड बेली सर्कस’ ही आता इतिहासजमा होणार आहे.

ओर्लांडो आणि मायामी येथील सर्कशीच्या खेळानंतर फेल्ड एंटरनमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष केनेथ फेल्ड यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाची माहिती दिली. यावेळी ते अत्यंत भावनाविवश झाले होते. “या निर्णयामागे खास असे कोणतेही कारण नाही. हा माझ्यासाठी व संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत कठीण काळ आहे,” असे ते म्हणाले. या वर्षी ही सर्कस दोन दौरे करणार असून मे महिन्यापर्यंत तिचे ३० खेळ होणार आहेत.

सर्कशीला येणाऱ्यांची घटती संख्या, वाढता खर्च आणि लोकांची बदलणारी आवड यामुळे सर्कशीला हा निर्णय घ्यावा लागला. त्याच प्रमाणे प्राणी हक्क संघटनांच्या दबावामुळेही कंपनीला हा निर्णय घेणे भाग पडले. प्रदीर्घ काळ खटलेबाजी केल्यानंतर गेल्या वर्षी या सर्कशीतील दोन हत्तींचे काम बंद करून त्यांना फ्लोरिडातील प्राणी पुनर्वसन केंद्रात पाठवावे लागले. त्यानंतर प्रेक्षकांची संख्या झपाट्याने घसरली.

या सर्कशीची स्थापना १८४१ साली झाली होती. तिचे सध्याचे नाव १९१९ सालापासून प्रचलित होते. “दि ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ” असे या सर्कशीचे वर्णन करण्यात येत असे. ते एवढे प्रसिद्ध होते, की १९५२ साली याच नावाचा एक चित्रपट बनविण्यात आला होता. त्याला ऑस्कर मिळाले होते.

Leave a Comment