स्पाईसजेट विकत घेणार २०५ विमाने


मुंबई – २०५ विमाने स्पाईसजेट कंपनी बोईंगकडून विकत घेणार आहे. स्पाईसजेट बोईंगकडून तब्बल २०५ विमानांची खरेदी करुन विमान सेवेचा विस्तार करणार आहे. विशेष म्हणजे भारतातील विमान कंपनीला बोईंग कंपनी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात विमानांची विक्री करणार आहे. हा व्यवहार तब्बल दीड लाख कोटी रुपयांचा असणार आहे.

स्पाईसजेटला बोईंग कंपनीकडून पुरवली जाणारी २०५ विमानांपैकी १५५ विमाने ७३८-८ मॅक्स प्रकारातील असणार आहेत. भारतीय विमान क्षेत्रातील हा एक मोठा खरेदी करार असल्यामुळे स्पाईसजेटला मोठा विस्तार करणे शक्य होणार असल्याचे स्पाईसजेटचे अध्यक्ष अजय सिंह यांनी सांगितले. सध्याच्या स्पाईसजेटकडे बी ७३७ एस प्रकारातील ३२ विमाने आहेत. तर क्यू ४०० एस प्रकारातील १७ विमाने आहेत.

स्पाईसजेटला आम्ही २०५ विमाने देणार आहोत. यासाठी स्पाईसजेटसोबत आम्ही एक दशकाहून जास्त कालावधीसाठी करार केला आहे. आम्हाला स्पाईसजेट सोबतच्या या भागिदारीमुळे आनंद झाला असल्याचे बोईंगचे उपाध्यक्ष रे कॉर्नर यांनी म्हटले आहे. तब्बल २२ बिलीयन अमेरिकन डॉलर मोजून स्पाईसजेट बोईंगकडून २०५ विमाने खरेदी करणार आहे. त्यामुळे आता स्पाईसजेटकडून महसूल वाढीसाठी विविध मार्गांचा विचार करण्यात येईल, असे स्पाईसजेटचे अध्यक्ष अजय सिंह यांनी सांगितले आहे.

Leave a Comment