शेतकरी झाला टाटा सन्सचा प्रमुख


मुंबई – टाटा सन्सच्या प्रमुखपदी टीसीएसचे सीईओ एन. चंद्रशेखरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते आता सध्याचे प्रभारी रतन टाटा यांच्या जागेवर काम करणार असून टाटा ग्रुपचे प्रमुख झाले आहेत. 7 लाख कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या टाटा ग्रुपच्या गुरूवारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सायरस मिस्त्री यांना हटविण्यात आल्यानंतर रतन टाटा यांची टाटा समुहाच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुयती करण्यात आली होती. या पदाचा कार्यभार चंद्रशेखरन 21 फेब्रुवारीला स्वीकारणार आहेत. ते टाटा समुहाचे पहिले गैर पारसी अध्यक्ष आहेत. टीसीएसचे सीफओ राजेश गोपीनाथन यांची टीसीएसच्या नवीन सीईओपदी निवड करण्यात आली आहे.

शेतकरी ते टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांना चंद्रा या नावाने ओळखले जाते. चंद्रा हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेतकरी म्हणून काम करत होते. त्यांनी आपल्या वडिलांची पारंपरीक शेती सांभाळली होती. चंद्रा यांनी त्रिची येथील रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी मास्टर इन कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन कोर्स पूर्ण केला.

1986मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी टीसीएसमध्ये 2 महिन्यांचा प्रोजेयट सादर केला. 1987मध्ये त्यांना अर्ज न करताच टीसीएसने नोकरीसाठी ऑफर दिली जी त्यांनी स्वीकारली. 54 वर्षीय चंद्रा यांनी 30 वर्षांच्या करियरमध्ये एक सॉफ्टवेअर प्रोग्रामर ते आता देशातील सर्वात मोठ्या उद्योग समुह असलेल्या टाटा सन्सचे चेअरमन होण्याचा मान मिळविला आहे.

टाटा सन्सचे नवे चेअरमन मॅरेथॉन स्पर्धेचे चाहते आहेत. त्यांनी न्यूयॉर्क, शिकागो, मुंबई आणि बंगळूरी येथे होणार्‍या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतलेला आहे. त्यांची फोटोग्राफी आणि संगीतामध्येही रुची आहे. चंद्रा हे 2009 पासून टीसीएसचे सीईओ आहेत. यापूर्वी ते कंपनीचे सीओओ म्हणून कार्यरत होते. चंद्रा यांना 25 ऑक्टोबरमध्ये टाटा सन्सच्या बोर्डावर घेण्यात आले होते.

Leave a Comment