एफएम रेडियोच्या शेवटाची सुरूवात; नॉर्वेची आघाडी


गेल्या काही वर्षांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या एफएम प्रणालीचे दिवसही भरत आले असून सध्याच्या रेडियोची उलटी गणना सुरू झाली आहे. यात युरोपमधील नॉर्वेने आघाडी घेतली आहे. हा देश एफएम रेडियो बंद करणारा पहिला देश ठरला आहे. एफएमच्या जागी डिजिटल ऑडियो ब्रॉडकास्टिंग टेक्निकचा (डीएबी) उपयोग केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दल

बुधवारी, ११ जानेवारी रोजी स्थानिक वेळेनुसार ११ वाजून ११ मिनिटांनी नॉर्वेच्या उत्तर भागातील नॉर्डलँड काऊंटीत एफएम प्रणाली बंद करण्यात आली. हा एक ऐतिहासिक क्षण होता, असे सरकारी रेडियो एनआरकेचे प्रमुख थॉर जेर्मनुंड एरिकसन यांनी सांगितले. देशाच्या संसदेने २०११ साली प्रणाली बदलण्यास संमती दिली होती. ती यंदा पूर्ण होईल. या वर्षीच्या १३ डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशात एफएम रेडियो बंद होतील.

एनआरके आणि अन्य खासगी प्रसारकांनी एफएम बंद करून डीएबीवरून प्रक्षेपण सुरू केले आहे. राष्ट्रीय पातळीवर असे पाऊल उचलणारा नॉर्वे हा पहिला देश बनला आहे, यावर एरिकसन यांनी जोर दिला.

एफएमच्या तुलनेत डीएबी हे आधुनिक तंत्रज्ञान असून यात खर्च कमी लागतो. शिवाय डीएबीवरून प्रक्षेपणासाठी वीजही कमी लागते. नॉर्वेमधील लोकवस्ती विरळ असून देशाचा बहुतेक भाग डोंगरांनी व्यापलेला आहे. एफएम लहरी डोंगर-दऱ्या पार करू शकत नाहीत. त्यामुळे त्याचा प्रक्षेपणावर परिणाम होत होता था. नव्या बदलामुळे लोकांना कार्यक्रम ऐकण्यासाठी नवीन रेडियो विकत घ्यावे लागतील किंवा संगणक अथवा मोबाईलवरून ते कार्यक्रम ऐकू शकतील.

मात्र नॉर्वेतील लोकांचा एफएम प्रणाली बदलण्यास विरोध होता. डेली वीजी नावाच्या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली होती. या सर्वेक्षणानुसार देशातील ५५.५ टक्क लोक एफएमऐवजी डीएबीचा स्वीकारण्यास नाखुश होते.

Leave a Comment