‘हा’ छोटा समीक्षक दर महिन्याला कमावतो कोट्यवधी


आपण आजवर अनेक समीक्षकांच्या समीक्षा वाचल्या-पाहिल्या असतील पण लहान मुलांच्या खेळण्यासोबत खेळता-खेळता कोट्यवधी कमावल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? आता तुमच्या मनात असा प्रश्न उभा राहिला असेल की खेळण्यांशी खेळून कोणी पैसे कमावते का? पण एक छोटा मुलगा असाही आहे, जो फक्त खेळण्यांशी खेळतो आणि त्यांच्यांबद्दल भरभरून बोलतो, तर कधी त्या खेळण्यांची तक्रार देखील करतो, पण तुम्हाला माहिती आहे का चिमुकला यातूनच दरमहिन्याला जवळपास सहा कोटी रुपये कमावतो. हा आकडा ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल पण हे सत्य आहे. रायन हा अवघ्या पाच वर्षांचा असून तो खेळण्यांवर समीक्षण करतो आणि या बदल्यात त्याला कोट्यवधी मिळतात.

रायन काही प्रसिद्ध किड्स युट्युबरपैकी एक आहे. रायनचा स्वत:चा युट्युब चॅनेल आहे. त्याच्या चॅनेलचे नाव Ryan ToysReview हे असून रायन या चॅनेलसाठी समीक्षण करतो. रायन फार काही करत नाही. तो नेहमीच वेगवेगळ्या खेळण्यांसोबत खेळतो. ही खेळणी त्याला कशी वाटली याबद्दल तो भरभरून बोलतो. कधी कधी छोटा रायन तक्रारही करतो. त्याच्या समीक्षण आणि गोंडस हसूचे सारे अमेरिकन नागरिक दिवाने आहे. रायनचा Ryan ToysReview युट्युब चॅनेल अमेरिकेत ब-यापैकी प्रसिद्ध आहे. ५० लाखांहून अधिक लोकांनी आतापर्यंत रायनचा युट्युब चॅनेल सबस्क्राईब केला आहे. तर त्याच्या अनके व्हिडिओंना कोट्यवधी व्ह्यूज आहे. ही संख्या ५० कोटींच्याही वर आहे. २०१५ पासून रायन सध्या प्रत्येक खेळण्यांवर समीक्षण करतो. रायनने २०१६ मध्ये अनेक खेळण्यांवर समीक्षण केले, त्यामुळे प्रसिद्ध किड्स युट्युबरमध्ये रायनच्या नावाचा समावेश झाला आहे.