हॉटेलऐवजी ट्री हाऊसमध्ये करा मुक्काम


सुटीसाठी बाहेर जाताना खाणे, फिरणे हे मुख्य उद्देश असतात व बहुतेक वेळा मुक्काम टाकण्यासाठी हॉटेलचा पर्याय निवडला जातो. मात्र पयॅटनाचा खरा रोमांच अनुभवायचा असेल तर राहायला अशी जागा निवडायला हवी जेथे नजर जाईल तेथे हिरवीगार वनश्री दिसेल, घराबाहेर पाऊल टाकताच जंगल स्वागताला असेल व पहाटे पक्ष्यांची मधुर किलबिल आपल्याला झोपेतून जागे करेल. पक्ष्यासारखे झाडावरील घरट्यात राहण्याची इच्छा पूर्ण होऊ शकेल. ही सारी सुखे तुम्हाला ट्री हाऊस मध्ये मुक्काम केल्याने प्राप्त होऊ शकतात. विशेष म्हणजे भारताच्या अनेक राज्यात अशी सुविधा उपलब्ध आहे.


ट्री हाऊस मध्ये राहण्याचे सुख घेण्यासाठी हिमाचल, केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश अशा अनेक राज्यांना भेट देता येईल. राजस्थानच्या जयपूर मधील ट्री हाऊस रिसॉर्ट खास आहे. हिरव्यागार वनश्रीच्या संगतीत राहताना येथे टिव्ही, एसी, वायफाय सह जंगल सफारी, पक्षी निरीक्षणाचा आनंद लुटता येईल. मनालीमध्येही ट्री हाऊस कॉटेजेस आहेत. सफरचंद, जर्दाळू, बोरांच्या घनदाट बागांमध्ये फेरफटका मारतानाच या ट्री हाऊसमधील निवासाचे सुख घेता येईल. तर मध्यप्रदेशातील बांधवगड येथे टायगर रिझर्व्ह व बांधवगड फोर्ट पाहण्याचा आनंद ट्री हाऊसमधील आरामदायक निवार्‍यासह लुटता येईल. केरळच्या टेक्काडी भागात निसर्गाशी संवाद साधताना ट्री हाऊस मध्ये राहण्याचे अनोखे समाधान तनामनाला शांततेचा अनुभव देऊ शकेल. त्यामुळे पर्यटनाला जात असाल तर एकदा तरी ट्री हाऊसमध्ये जरूर मुक्काम करा.

Leave a Comment