महिलांना एअर इंडियाच्या विमानातही मिळणार आरक्षण


नवी दिल्ली – महिलांसाठी भारताची राष्ट्रीय हवाई कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या विमानांमध्ये राखीव आसने ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या विमानांमध्ये येत्या १८ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. विमानाच्या पुढच्या भागातील दोन रांगा किंवा सहा आसने महिलांच्या सुरक्षिततेसाठी आरक्षित करण्यात आली आहेत. कोणतेही अतिरिक्त शुल्क यासाठी आकारले जाणार नाही, अशी माहिती एअर इंडियाचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक अश्विनी लोहानी यांनी दिली.

अशाप्रकारे कोणत्याही विमानांमध्ये महिलांसाठी आसने राखीव जगात पहिल्यांदाच ठेवण्यात येणार आहेत. भारतामध्ये महिलांसाठी सध्या रेल्वे, मेट्रो, बस प्रवासामध्ये राखीव आसने किंवा डब्ब्यांची सोय आहे. याशिवाय, गुरगाव आणि नोएडा येथे तर महिलांसाठी आरक्षित असलेल्या गुलाबी रंगाच्या रिक्षा सुरू करण्यात आल्या होत्या. दरम्यान, एअर इंडियाच्या विमानांमध्ये देण्यात येणारे हे आरक्षण इकॉनॉमी क्लासपुरते मर्यादित असेल. राष्ट्रीय विमान कंपनी म्हणून महिला प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षितरीत्या प्रवास करता यावा, असे आम्हाला वाटते. सध्या अनेक महिला विमानाने एकट्याने प्रवास करतात, असे एअर इंडियातर्फे सांगण्यात आले.

Leave a Comment