मनसेचे एकला चलो रे


विधानसभा, लोकसभा आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीत आपला कसलाही प्रभाव पाडण्यात अपयशी ठरलेल्या मनसेचे सर्वोच्च नेते राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकांत कोणाशीही युती करण्याबाबत नकारघंटा वाजवली आहे. युतीबाबत मला कोणी भेटलेले नाही त्यामुळे माझी कोणाशी चर्चा आणि पर्यायाने युती होण्याची शक्यता नाही असे त्यांनी जरा चिडूनच सांगितले आहे. कदाचित आपल्याला कोणाशी युती करता येत नाही याची बोच त्यांच्या मनाला लागली असेल. कारण एक काळ होता की जेव्हा राज ठाकरे ही कोणीतरी युतीचा प्रयत्न करावा इतकी दखलपात्र शक्ती होती. पण गेल्या काही दिवसांत झालेल्या विविध निवडणुकांत पक्षाला फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. त्यामुळे आता कोणालाही मनसेशी युती करण्याचा मोह होत नाही. परिणामी राज ठाकरे चिडचिड करायला लागले आहेत.

आता त्यांनी भाजपाला टीकेचे लक्ष्य तर केले आहेच पण भाजपा आणि शिवसेना यांच्याकडे पैशाशिवाय काहीही नाही असे म्हटले आहे. शिवाय या दोन्ही पक्षांना सतत दूषणे देऊन ते आपली निराशा लपवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांची मन:स्थिती विचारात घेतली असता त्यांच्या चिडचिडीचे कारणही सापडते आणि त्यांच्या कसल्याही टीकेला कोणी उत्तर देण्याचीही काही गरज नाही हेही लक्षात येते. सध्या भाजपावर उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि राहुला गांधी हे तिघेही टीकेचे प्रहार करीत आहेत. पण त्यांच्या टीकेला कृतीची जोड नाही.

राहुल गांधी यांच्या हातात दहा वर्षे सत्ता होती पण त्यांनी त्या काळात केन्द्रातले एखादे खाते स्वीकारून त्याचा कारभार करून दाखवला असता आणि आपल्यात काही प्रशासनिक गुण आहेत हे सिद्ध करून दिले असते तर आज त्यांच्या बाष्कळ बोलण्याला काही तरी किंमत आली असती. तीच अवस्था राज ठाकरे यांचीही आहे. त्यांनी आपल्या हातात आलेल्या नाशिक महानगर पालिकेत आपल्या कौेशल्याचा आविष्कार घडवायला हवा होता. उलट त्यांचा अनुभव चांगला आला नाही आणि त्यामुळे जनतेच्या मनातले त्यांचे स्थान ढळले. पक्षाला एवढी गळती लागली की आधीच बाहेरच्या आधारावर टिकलेली नाशिक मनपाची सत्ता हातातून जाऊ नये यासाठी त्यांना चक्क राष्ट्रवादीपुढे पाठींंब्यासाठी पदर पसरावा लागला. आता त्यांना राजकारणात किमत नाही पण अजूनही मनपा मध्ये ताकद दाखवण्याची संधी आहे. ती ते कशी वापरतात हे आता दिसेलच.

Leave a Comment