आता बेनामी लॉकर्स आयकर विभागाच्या रडारवर


नवी दिल्ली: नोटबंदीनंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी आणि छापेसत्रांमध्ये अनेक संशयास्पद लॉकर्स बॅंकांमध्ये असल्याचे आयकर विभागाला आढळून आले आहे. या लॉकर्सचा दुरुपयोग अवैध स्वरूपाची रोकड आणि दागिने दडविण्याच्या उद्देशाने केला जात असल्याचा अधिकाऱ्यांना संशय असून त्याचे मूळ मालक कोण याचा शोध घेण्यास आयकर विभागाने सुरुवात केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी चलनातून ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर सुरू करण्यात आलेल्या लॉकर्सची माहिती आयकर विभागाने विविध बँकांकडून मागविण्यास सुरुवात केली आहे. या बँकांमध्ये प्रामुख्याने सहकारी बँकांचा समावेश आहे.

नोटाबंदीनंतर आयकर विभागाने केलेल्या छापेमारीमध्ये सुमारे १ लाख रुपयांची रोकड आणि स्वरूपातील सोने जप्त करण्यात आले आहे. आतापर्यंत ५ हजार ३४३ रुपयांची रक्कम काळ्या पैशाच्या स्वरूपात असल्याचे उघड झाले आहे. याशिवाय आणखी ६ हजार संशयित खातेदारांना आयकर विभागाने नोटीसा पाठविल्या आहेत.

काळा पैसे उघड करण्याच्या उद्देशाने आयकर विभागाने लॉकर्सची चौकशी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान लॉकर्स सील केले जाणार नाहीत; तर त्याचा वापर नेमका कशासाठी होत आहे; यावर लक्ष ठेऊन त्याचा खरा वापरकर्ता कोण आहे; हे शोधून काढण्यात येणार आहे; असे आयकर विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment